औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(घाटी) येथून जळगावला पळविण्यात आलेल्या डॉक्टरांच्या जागांवर कंत्राटी डॉक्टरांचा डोस देण्यात आला आहे. रिक्त झालेल्या जागांवर शुक्रवारी मुलाखत प्रक्रियेने कंत्राटी पद्धतीवर दोघांची निवड करण्यात आली. यामुळे रेडिओलॉजी अभ्यासक्रमाच्या (डिप्लोमा)दोन जागांवर येणारे गंडांतर अखेर दूर झाले आहे. मेडिसिनच्या जागांवर मात्र अद्याप संकट कायम आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय वैद्यक परिषद यांच्या नियमानुसार शिक्षकांच्या संख्येनुसार पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा ठेवल्या जातात. वर्ष २०१८ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १२ अनुभवी डॉक्टरांची जळगाव येथे नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली. त्यामुळे औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या कमी झाली. 'एमसीआय'च्या पाहणीत ही बाब प्राधान्याने समोर आली. त्यामुळे मेडिसिन आणि रेडिओलॉजीच्या अभ्यासक्रमाच्या काही जागा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली.
ही सगळी शक्यता गृहित धरून कंत्राटी पद्धतीवर वैद्यकीय शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया शुक्रवारी राबविण्यात आली. यामध्ये रेडिओलॉजीच्या दोन जागांसाठी मुलाखत घेण्यात आली. यात डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी आणि डॉ.पंकज आहिरे यांची सहयोगी प्राध्यापकपदी निवड करण्यात आली. तर मनोविकृतीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमसाठी प्राध्यापकपदी डॉ.संजीव सावजी यांची निवड करण्यात आली. मेडिसीनच्या तीन जागांसाठी मुलाखतीसाठी कोणीही आले नाही. त्यामुळे मेडिसिनच्या जागा कमी होण्याची भीती व्यक्ती होत आहे. अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, डॉ.राजन बिंदू, डॉ. एल. एस . देशमुख, डॉ.वर्षा रोटे, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. सिराज बेग, सुभाष जाधव, दत्तात्रय जोशी यांनी मुलाखत प्रक्रियेतून त्यांची निवड केली.
नुकसान नाहीजळगावला गेलेल्या डॉक्टरांच्या जागी कंत्राटी डॉक्टर घेण्यास परवानगी मिळाली आहे.त्यामुळे कोणत्याही जागांचे नुकसान होणार नाही.- डॉ. कानन येळीकर , अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय