औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष कोरोनाची सर्व बंधने झुगारणारा ठरला. अख्ख्या गावाचा जल्लोष असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग नावापुरताच उरल्याचे दिसले. होमगार्ड कार्यालयात मतमोजणी केंद्र होते, या केंद्रापासून ३०० मीटर अंतरावर ७७ ग्रामपंचायतीतील उमेदवार, समर्थकांची मोठी गर्दी होती. सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवित विनामास्क आलेल्या समर्थकांनी कोरोना फक्त नावापुरताच आहे, हे सिध्द करून दाखविले. प्रत्येक तालुक्यात असाच प्रकार घडल्याचे वृत्त आहे.
गर्दी, जल्लोष, गुलाल उधळण्यास बंदी असतांनाही पोलिसांसमक्ष विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्र परिसरात जोरदार जल्लोष करीत घोषणाबाजी केली. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. यात आगोदरच ६ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने ७१ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सोमवारी (दि. १८) सकाळी ९ वाजता टी.व्ही सेंटर येथील होमगार्ड कार्यालयात सुरूवात झाली. १४ टेबलवर २१ फेऱ्या झाल्या.
कलम १४४ च्या धज्ज्या
विजयी उमेदवारांच्या मिरवणुका आणि जल्लोषावर कलम १४४ ने काहीसे विरजन आणले, परंतु मतमोजणी केंद्रावर या कलमाचे सर्रासपणे उल्लंघन झाले. बॅरिकेट्समधून आत येणाऱ्यांवर पोलिसांनी लाठी उगारली. परंतु अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांना जुमानले नाही. तोबा गर्दीने कलम १४४च्या पार धज्ज्या उडविल्या.