औरंगाबाद : शहरातील जालना रस्त्यावर तासाभरात तब्बल २ हजार ३४० चारचाकी वाहने धावतात. दिवसभरात १० तासांचा विचार केला, तर ही संख्या २३ हजारांवर जाते. मात्र, यातील निम्म्या चारचाकींसाठीही शहरात सावर्जनिक पार्किंगची सुविधा नाही.
व्यावसायिक इमारतींमध्येही पार्किंगसाठी जागा सोडण्यात आलेली नाही. पार्किंगच्या जागांवर सर्रास अवैध बांधकाम करण्यात आलेले आहे. परिणामी, किमान १० हजारांवर वाहने रस्त्यांवरच उभी क रण्याची वेळ येत आहे. त्यातून वाहतुकीचा बट्ट्याबोळ होत आहे.नोकरी, व्यवसाय, खरेदीनिमित्त नागरिक घराबाहेर पडतात. नियोजित स्थळी पोहोचल्यानंतर वाहन उभे कुठे करायचे, यासाठी पार्किंगची जागा शोधावी लागते. पार्किंगची सुविधाच नसल्याने मिळेल त्या जागेत वाहन उभे करून नागरिक मोकळे होतात. शहरातील जालना रोड, औरंगपुरा, गुलमंडी, क्रांतीचौक, रेल्वेस्टेशनसह प्रत्येक मार्गावर भररस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. शहरात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
शहरातील जालना रोडसह बहुतांश रस्त्यांवरील व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगच्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अनेक हॉटेल, कार्यालये, रुग्णालयांमध्ये पार्किंगच्या जागेत अवैधरीत्या बांधकामे करण्यात आली आहेत. पार्किंगऐवजी अन्य सुविधेसाठी जागांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना थेट रस्त्यावर वाहन उभे करावी लागतात. रस्त्यांवरच वाहन उभे केले जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होते. सायंकाळी मुख्य बाजारपेठेत पायी चालणेही अवघड होते.
...अशी केली पाहणीलोकमत प्रतिनिधीने शहरातील आकाशवाणी चौकात दुपारी ३ वाजेच्या सुमारास सेव्हन हिलकडून मोंढ्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांच्या संख्येचा आढावा घेतला. तेव्हा तासाभरात २ हजार ३४० चारचाकी वाहने जात असल्याचे निदर्शनास आले. ४या आकडेवारीनुसार सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान या ठिकाणाहून किमान २३ हजार चारचाकी रवाना होतात. यातील ५० टक्के म्हणजे १० हजार वाहने जरी सार्वजनिक ठिकाणी थांबत असल्याचे गृहीत धरल्यास पार्किं गसाठी २० एकर जागा लागेल. प्रत्यक्षात काही वाहनांपुरतीच पार्किंगची सुविधा आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावरच उभी होत असल्याची परिस्थिती आहे.
याठिकाणी पार्किंग व्यवस्थामहापालिकेने काही वर्षांपूर्वी ‘पे अॅण्ड पार्क ’ची व्यवस्था केली होती; परंतु त्या जागाही आता गायब झाल्या आहेत. गुलमंडी, पैठणगेट, सिद्धार्थ उद्यान येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. पी-१, पी-२ अशी व्यवस्था काही रस्त्यांवर करण्यात आलेली आहे. मात्र, वाहनांच्या संख्येचा विचार करताना शहरात सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे पार्किंगसाठी जागा शोधण्याची वेळ वाहनधारकांवर येते.
पार्किंग धोरणाचा कागदोपत्री खेळ१९९१ आणि २००२ या दोन शहर विकास आराखड्यात २० पेक्षा अधिक जागांवर पार्किंगसाठी आरक्षण टाकलेले आहे. मात्र, यातील एकाही जागेवर भूसंपादन झालेले नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही पार्किंग धोरणाचा फक्त कागदोपत्री खेळ सुरू आहे. महापालिकेच्या अनास्थेमुळे शहरातील रस्त्यास्त्यांवर वाहनांची पार्किंग होत असल्याची परिस्थिती आहे.