लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणातील काही कामे कमी करण्याबाबत एनएचएआयच्या वरिष्ठांनी भूमिका घेतली आहे. संबंधित प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्ली मुख्यालयाने अजून उघडूनही पाहिलेला नाही. तत्पूर्वीच त्या ७८९ कोटींच्या प्रकल्पातील काही कामे कमी करावेत व सुधारित अंदाजपत्रक फेबु्रवारी २०१८ च्या अर्थसंकल्पात अनुदान तरतुदीसाठी मांडावे, याबाबत विचार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.फेबु्रवारी २०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जर निधीबाबत तरतूद झाली, तरच त्या दोन्ही रोडच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याबाबत विचार होईल, अशी भूमिका नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्ली मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी घेतली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या दोन्ही प्रकल्पांचा आकडा यंदाच्या डीएसआरनुसार ७८९ वरून ८६० कोटींवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी १९ सप्टेंबर रोजी जालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रोडच्या कामांसाठी ७८९ कोटी रुपयांच्या निविदा प्रकाशित करण्यासाठी एनएचएआयच्या दिल्ली मुख्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. निविदा काढण्यासाठी दीड वर्षापासून चालढकल सुरू आहे. या दोन्ही रोडवरील उड्डाणपुलांचे काम कमी करावेत. फक्त आहे तेवढा रस्ता काँक्रिटीकरणातून करण्यात यावा. तसेच बीओटीवर काम करण्याबाबतही मध्यंतरी चर्चा झाली.डिसेंबर २०१५ मध्ये केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी जालना रोड रुंदीकरणासाठी ४०० कोटी, तर बीड बायपासच्या रुंदीकरणासाठी ३८९ कोटी रुपयांतून काम करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी या दोन्ही प्रकल्पांबाबत वारंवार आढावा घेतला, तरी पुढे काहीही झाले नाही.दोन उड्डाणपूल कमी करण्याची चर्चाबीड बायपासच्या कामाबाबत तर काहीच चर्चा होत नाही. सध्या जालना रोडच्या प्रकल्पातील कामे कटछाट करण्याबाबत वावड्या उठत आहेत. औरंगाबाद ते पुणे या प्रकल्पात नगरनाका येथील उड्डाणपूल समाविष्ट करावा. तसेच केंब्रिज शाळेजवळील उड्डाणपूल औरंगाबाद ते जालना या सहापदरी प्रकल्पात समाविष्ट करावा.ड्रायपोर्टसाठी सहा पदरी रस्ता करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. हे दोन्ही पूल जालना रोडच्या ४०० कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पातून वगळले, तर २७५ कोटींत जालना रोडचे रुं दीकरण होणे शक्य होईल. बीड बायपास आणि जालना रोड हे दोन्ही प्रकल्प ७८९ वरून ५५० ते ६०० कोटींच्या आसपास व्हावेत असा सुधारित प्रस्ताव फेबु्रवारी २०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पासमोर मांडण्याबाबत हालचाली झाल्यानंतरच हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागतील अन्यथा नाही, असे सूत्रांनी सांगितले.
जालना रोड, बायपासच्या प्रकल्पात होणार कटछाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:26 AM