औरंगाबाद : जालना येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा नियोजित दौरा १७ सप्टेंबर रोजी असल्याने औरंगाबाद- जालना मार्गावर असलेले खड्डे भरले जात आहेत. अनेक दिवसांपासून या मार्गावरील खड्डे हा चर्चेचा विषय ठरले होते. दौऱ्यानिमित्त का होईना रस्ता खड्डेमुक्त होत असल्याने प्रवाशांतून समधान व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने औरंगाबाद-जालना हा मार्ग बीओटी तत्त्वावर बांधण्यासाठी दिला होता. या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सद्भाव एजन्सीला देण्यात आलेली आहे. गत काही दिवसांपासून या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघातांतही वाढ झाली होती. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. पावसाचे पाणी साचून या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात वाढले होते. ‘लोकमत’ने या खड्ड्यांबाबतचे वृत्त प्रकाशित करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते.
पावसाळा सुरू असल्याने पावसाच्या पाण्यामुळे खड्डे पुन्हा उघडे पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे काही ठराविक खड्डे भरण्यात आले. त्यातच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा जालना दौरा निश्चित झाला. त्यांच्या कार्यालयाकडून तशा सूचना जारी झाल्यानंतर सार्वजनिक विभागाच्या अभियंत्यांना जाग आली.
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे कौशल्यविकास विद्यापीठाच्या भूमिपूजनासाठी जालना येथे १७ सप्टेंबर रोजी जात आहेत. ते औरंगाबादमार्गे जालन्याकडे रवाना होणार असल्याने औरंगाबाद- जालना मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी संबंधित एजन्सीला दिले. त्यानंतर बुधवारपासून या मार्गावरील खड्डेभरणीस सुरुवात करण्यात आली.
४८ कि़मी. रस्त्यावर खड्डेऔरंगाबाद ते जालना या मार्गावरील केम्ब्रिज चौक ते नागेवाडी टोल नाका यादरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. एकूण ४८ कि.मी. रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यामुळे हा मार्ग खड्डेमुक्त होणार असल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
दर्जेदार साहित्यातून डागडुजी व्हावीजालना रस्त्यावर पडलेले खड्डे भरले जात असले तरी ते अल्पायुषी ठरू नयेत. यासाठी दर्जेदार खडी, डांबर व इतर साहित्याचा वापर करण्यात यावा. जेणेकरून पुढील किमान दोन वर्षे रस्ता खड्डेमुक्त राहील, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांतून केली जात आहे.