- श्यामकुमार पुरेसिल्लोड : बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोड शहरात सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच तालुक्यातील गोळेगाव, पानवडोद, अंधारी,उंडणगाव, भराडी सहित तालुक्यातील ३० ते ३५ गावात बंद पाळण्यात आला. सिल्लोड शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकल हिंदू समाजाच्यावतीने आज दुपारी शहरातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. भगवान महावीर चौकात या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बांगलादेशमध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काय आहेत मागण्या विदेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढा, वक्फ बोर्ड बरखास्त करा, गडकिल्यावरील अतिक्रमण काढा, जे राखी बांधत नाहीत त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देऊ नका, मदरसे बंद करा, लव्ह जेहाद, गोहत्या बंदी कायदा लागू करा, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार रुपेश खंडारे यांना आंदोलकांनी दिले.
हिंदूंसाठी सीमा उघडामोर्चाला मार्गदर्शन करताना सकल हिंदू समाजाचे सुरेश चव्हाण म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार थांबवा. भारतात येणाऱ्या बांगलादेशी हिंदूंसाठी सीमा उघडून द्या, विभाजनानंतर पाकिस्तान व बांगलादेश जसे मुस्लिम देश झाले, तसे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा. तसेच हिंदूंनी एक, दोन अपत्यांवर न थांबता लोकसंख्या वाढवावी असे आवाहन देखील चव्हाण यांनी यावेळी केले.