औरंगाबाद : जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस १० फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे, असा संदेश शेकडो प्रवाशांच्या मोबाईलवर शनिवारी दुपारी ४ वाजता धडकला. प्रवासाच्या ऐन एक दिवसाआधी मिळालेल्या माहितीने मुंबईला जाणाºया प्रवाशांची धावपळ झाली.
मुंबई विभागात कल्याण आणि टिटवाळा रेल्वेस्टेशनजवळीलरेल्वे पुलाच्या कामासाठी रविवारी सकाळी १० ते दुपारी २.१५ वाजेदरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे दादर ते जालना आणि जालना ते दादर जनशताब्दी एक्स्प्रेस रविवारी रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे देण्यात आली.औरंगाबाद स्टेशनहून सकाळी ६ वाजता रवाना होणाºया जनशताब्दी एक्स्प्रेसला प्रवाशांची गर्दी असते.
मुंबईला जाणाºया प्रवाशांना सर्वात सोयीची ही रेल्वे ठरते. अनेक दिवसांपूर्वी प्रवासाचे नियोजन के लेल्या प्रवाशांना रविवारी ही रेल्वे रद्द झाल्याची माहिती मिळाली. अनेकांनी प्रवास रद्द करण्यावर भर दिला, तर महत्त्वाच्या कामासाठी जाणे आवश्यक असलेल्या अनेक प्रवाशांनी खाजगी बसचे तिकीट बुक करण्याकडे धाव घेतली. आर्थिक भुर्दंड सहन करून मिळेल त्या ट्रॅव्हल्सचे तिकीट घेण्याची वेळ प्रवाशांवर आली.