औरंगाबाद : राज्यातील सध्याचे सरकार हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे. ते मराठ्यांना कधीही स्वत:हून आरक्षण देणार नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे हेही मूर्खपणाचे आहे. आपल्याला आरक्षण हवे असेल तर ते गुजरातेतील पटेल आणि हरियाणातील जाटांप्रमाणे रस्त्यावर उतरूनच मिळवावे लागेल, त्यासाठी सर्वस्व त्यागण्याची तयारी ठेवा, असे आवाहन आ. नितेश राणे यांनी येथे मराठा समाजातील तरुणांना केले. राज्याचे उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे हे ड्युप्लिकेट मराठा आहेत, त्यांची डीएनए तपासणी करायला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी तावडे यांच्यावरही टीका केली. छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचच्या वतीने शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा आरक्षण महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून नितेश राणे बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नामदेवराव पवार, प्रदीप सोळुंके, माजी महापौर सुदाम सोनवणे, अभिजित देशमुख, संदीप बोरसे, सरोज पाटील, अमोल रंधे, अक्षय सोळुंके, नीलेश भोसले, अक्षय काथार आदींची उपस्थिती होती. यावेळी राणे यांनी भाजप, शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्यातील भाजप सरकारने मराठ्यांना मिळालेले आरक्षण काढून घेतले. इतर कोणत्याही जातीबाबत हे सरकार अशी हिंमत करू शकले नसते. पण मराठ्यांच्या बाबतीत त्यांनी केली. दुर्दैवाने दोन वर्ष उलटली तरी हे आरक्षण बहाल करण्याविषयी कोणीही बोलत नाही. विधिमंडळात आज मराठा समाजाचे एकूण १४५ आमदार आहेत, पण तेही गप्प आहेत. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. एवढी मोठी संख्या असूनही सर्व जण आज शेपूट घालून बसलेत. त्यांना कशाचाही राग येत नाही. हे तीन टक्क्यांचे सरकार सतत मराठा समाजाला डिवचण्याचे काम करीत आहे. आधी जिजाऊंविषयी चिखलफेक करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण दिले. या राज्यात एकीकडे खोटे शिवचरित्र सांगणाऱ्यांना महाराष्ट्रभूषण मिळतो आणि दुसरीकडे खरे शिवचरित्र ज्यांनी मांडले त्या पानसरेंची हत्या होते. हे कशाचे द्योतक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल असे समजणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.मेटे नव्हे चाटेनितेश राणे यांनी यावेळी विनायक मेटे आणि विनोद तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. सरकारने मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदी विनोद तावडे यांची निवड केली आहे. परंतु दोन वर्षे झाली या तावडेंनी समितीची एकही बैठक घेतलेली नाही. त्यांच्या जोडीला बीडचे मेटेही आहेत. मेटे कसले त्यांचे नाव तर चाटे ठेवले पाहिजे, कारण त्याशिवाय ते दुसरे काहीच करीत नाहीत, असेही राणे म्हणाले.
जाट, पटेलांसारखे रस्त्यावर उतरा
By admin | Published: May 14, 2016 11:56 PM