औरंगाबाद : सासऱ्याने स्वत:चा भाडेकरारनामा करून दिलेला प्लॉट परस्पर बनावट सह्या करुन जावयाने तिसऱ्याच व्यक्तीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. जावयाने सासऱ्याच्या घरातील प्लॉटचे मूळ कागदपत्रेही गायब केले आहेत. या प्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन जावयाविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनी येथील रहिवासी विजय हिरालाल अग्रवाल (६१) यांचा बगशेरगज दाऊदपूर येथील सर्वे नंबर १० मध्ये प्लॉट आहे. त्यांनी हा प्लॉट २०१२ मध्ये खरेदी केला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी एका व्यक्तीस नोंदणीकृत भाडे करारनामा करून ३६ महिन्यांकरिता गॅरेज वापरासाठी दिला होता. हा करारनामा करताना साक्षीदार विजय अग्रवाल यांचे जावई निलेश प्रेमकुमार अग्रवाल हे होते. या घडामोडीनंतर २० जुलै रोजी काही व्यक्ती प्लॉटच्या जागेवर येत हा प्लॉट विजय अग्रवाल यांच्या जावयाने विकल्याचे सांगितले. या घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी घरात प्लॉटचे मूळ कागदपत्रे शोधले असता सापडले नाहीत. तसेच जावई निलेश अग्रवाल याने खोट्या सह्या करुन सदरचा प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर तो प्लॉट अन्य व्यक्तीला विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.