औरंगाबाद : हिरवागार सुरती गुळभेंडी हुरडा गुलमंडीवर विक्रीसाठी आला आहे. हा हुरडा २५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. दुष्काळ असतानाही हुरडा हिरवागार दिसत आहे, कारण शेतात टँकरने पाणी देऊन तो जगविला जात आहे. असे असतानाही यंदा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत हुरड्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हिवाळ्याला सुरुवात होताच हुरडा बाजारात विक्रीला येत असतो. गुलाबी थंडीमध्ये तर हुरडा खाण्याची मज्जाच काही औरच असते. गंगापूर तालुक्यातील नरसापूर व सारंगपूर या छोट्याशा गावांचे अर्थकारण याच हुरड्यावर चालते. येथील हुरड्याची चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते. मागील वर्षी पावसामुळे हुरडा खराब झाला होता. यामुळे डिसेंबरच्या अखेरीस ६०० रुपये प्रतिकिलोपर्यंत हुरडा विकला गेला. यंदा पाऊस कमी पडल्याने हुरड्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत.
व्यापारी अण्णासाहेब शिंदे (नरसापूर) यांनी सांगितले की, दोन्ही गाव मिळून सुमारे ९०० एकर क्षेत्रापैकी ४५० ते ५०० एकरांवर हुरडा घेतला जातो. ज्वारीला पाणी कमी लागते; पण यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे आता शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी विकत आणून हुरडा जगविला आहे. एका एकरवर ८०० किलो हुरडा येत असतो.
उत्पादनाची परिस्थिती लक्षात घेता यंदा २५० ते ३०० किलो हुरडा हाती येईल. मागील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरुवातीला दररोज संपूर्ण नरसापूर गावातून २० ते २५ क्विंटल हुरडा विक्रीला येत असे. मात्र, यंदा ३ ते ४ क्विंटल हुरडा विक्रीला येत आहे. हा हुरडा विक्रीला गुलमंडीवर आणला जातो. गुलमंडीवर रविवारी २० ते २५ किलो हुरडा विक्रीला आला होता. विक्रेते राजू शिंदे (नरसापूर) यांनी सांगितले की, आज २५० रुपये किलोने हुरडा विकला जात आहे. मात्र, या भावात मागणी कमी आहे.
हुरड्याला मागणी वाढणार शेतकरी प्रवीण पारधे (सारंगपूर) यांनी सांगितले की, मागील वर्षी हुरड्याला किलोमागे ६०० रुपये भाव मिळाला होता. यंदा टँकरचे पाणी आणून हुरडा जगविला जात आहे. पुढील महिन्यात मागणी वाढेल तर हुरड्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे.