पैठण : नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गुरूवारी सोडण्यात आलेले पाणी २४ तासाच्या अवधीनंतर जायकवाडीत आज सायंकाळी दाखल झाले. जायकवाडी साठी हंगामातील नाशिकच्या पाण्याच्या शुभारंभ आज झाला असून जायकवाडी धरणात १८७६२ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. धरणाचा जलसाठा ६०% झाला असून धरणात येणारी आवक लक्षात घेता जलसाठ्यात गतीने वाढ होईल अशी अपेक्षा कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.
यंदा नाशिक व नगर जिल्ह्यातून आवक झालेली नसताना जायकवाडी ५७% भरले होते. स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे यंदा ही किमया घडली. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गुरूवारी१६८६५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेनंतर हे पाणी जायकवाडीच्या नाथसागरात येऊन धडकले. शुक्रवारी सुद्धा नाशिक ३८ मि मी, त्र्यंबकेश्वर ११० मि मी, ईगतपुरी १२० मि मी, व घोटी ९३ मि मी अशी जोरदार पावसाची नोंद झाली या मुळे दारणा धरणातून ९९५६ क्युसेक्स , भावली धरणातून ९४८ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. गुरूवारपासून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात सुरू असलेला विसर्ग १६८६५ क्युसेक्स कायम आहे. यामुळे नाशिक ते पैठण गोदावरी भरून वहात आहे.
जायकवाडी धरण ६०% भरले असून धरणाची पाणीपातळी १५१३.५९ फूटापर्यंत वाढली आहे. धरणात एकूण जलसाठा २०१८.९३२ दलघमी ( ७१.२८टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १२८०.८२३ दलघमी ( ४५.२२ टिएमसी) ईतका झाला आहे अशी माहिती धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदिप राठोड यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील पाण्याची आवक सुरू झाल्याने जायकवाडी धरण यंदासुध्दा १००% भरेलच असा विश्वास कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केला आहे.