पैठण : स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने यंदा आत्मनिर्भर झालेल्या जायकवाडी धरणात गेल्या चार दिवसापासून नाशिकचे पाणी दाखल होत असल्याने जायकवाडी धरणाचा जलसाठा ६६ % झाला आहे. दि १४ पासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी मोठ्या क्षमतेने नाथसागरात सामावले जात असून चार दिवसात जलसाठ्यात दहा टक्क्याने भर पडली आहे. सोमवारी धरणात २२७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती . दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने या धरण समुहातून लवकरच विसर्ग होईल अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाच दिवसापासून या बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. आज सकाळी ११०७९ क्युसेक्स क्षमतेने या बंधाऱ्यातून विसर्ग करण्यात येत होता तो सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान १४२३४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात आहे. दारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ११५५० क्युसेक्स वरून ७६०८ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला. जायकवाडी धरणात २२७५७ क्युसेक्स अशी आवक सुरू आहे, दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात होणाऱ्या विसर्गात वाढ झाल्याने धरणात येणारी आवक वाढणार असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदीप राठोड यांनी सांगितले. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी सोमवारी सायंकाळी १५१५.२२ फूट झाली होती. जायकवाडी धरणात एकूण जलसाठा. २१६९.८९६ दलघमी तर उपयुक्त जलसाठा १४३१.७९० दलघमी ईतका झाला आहे.
भंडारदरा धरणातील पाण्याची प्रतिक्षा...अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ९६% भरले असून भंडारदरा धरणातून ४३९९ क्युसेक्स क्षमतेने निळवंडे धरणात विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरण सोमवारी सायंकाळी ८०% भरले होते , निळवंडे ९०% भरल्यानंतर या धरणातून ओझर वेअर मध्ये विसर्ग करण्यात येईल व हे पाणी प्रवरा नदी मार्गे जायकवाडीत दाखल होईल. येत्या दोन दिवसात निळवंडेतून विसर्ग सुरू होईल अशी अपेक्षा धरण नियंत्रण कक्षातून व्यक्त करण्यात आली. प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे देवगड बंधाऱ्यातून प्रवरा नदी पात्रात सोमवारी १७६९ क्युसेक्स असा विसर्ग सुरू होता असे राजेंद्र काळे यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील धरणाची टक्केवारी.....करंजवन ३५.३८%, वाघाड ३५.७१%,ओझरखेड ४३.०५%,पालखेड ६६.०२%,गंगापूर ८०.४५%,गौतमी ५०.७४%,कश्यपी ४०.७८%, कडवा ९२.८९%,दारणा ९०.०८%,
अहमदनगर जिल्ह्यातील धरणाची टक्केवारी.....भंडारदरा ९५.९३%निळवंडे ७८.४३%मुळा ६५.५५%.