औरंगाबाद : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाची पातळी सध्या ७८.१४ टक्क्यांवर आली आहे. ८३ टक्क्यांवर धरणाची पातळी गेल्यावर दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. बुधवारी सकाळी सिंचन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होईल. बैठकीला मुख्य अभियंता विजय घोगरे, गवळी यांच्यासह जायकवाडी प्रकल्प अभियंत्यांची उपस्थिती असणार आहे. कडा, पाटबंधारे महामंडळाशी चर्चा करून धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे.
मागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन १९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणाला ४६ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. ४६ वर्षांत सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग मागील तीन वर्षांत करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. यंदादेखील धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेकचा विसर्गजायकवाडी जलविद्युत केंद्रातून १९ रोजी सायंकाळी ७ वाजता १५८९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुढील दोन दिवसांत दरवाजे उघडल्यास अतिसतर्कतेच्या सूचना आहेत.
चार दिवसांत वाढले २० टक्के पाणीदि. १५ जुलै रोजी धरण ५८ टक्क्यांवर होते. १९ जुलैच्या सायंकाळी धरणात ७९ टक्क्यांपर्यंत पाणी आले. चार दिवसांत २० टक्के पाणी धरणात वाढले. १९ रोजी धरणात १६९६.४७३ दशलक्ष घनमीटर जिवंत जलसाठा असल्याची नोंद झाली. धरणाची पूर्ण क्षमता २१७० दशलक्ष घनमीटर आहे. धरणात ५१ हजार ७२१ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.