पैठण (औरंगाबाद), दि. 23 : जायकवाडी धरणात येणारी आवक नगण्य झाल्याने धरणातून होणारा विसर्ग आज दुपारी ३.३० वा पूर्णपणे बंद करण्यात आला. जायकवाडीत येणारी आवक गेल्या १२ तासापासून सारखी घटत असल्याने धरण प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासून धरणाच्या विसर्गात कपात करण्यास प्रारंभ केला होता. मात्र दुपारच्या सत्रात धरणात येणारी आवक जवळपास बंद झाल्याने तातडीने धरणातून होणारा विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व धरणाचे दरवाजे ३ ते ३.३० वाजेपर्यंत बंद करण्यात आले. दरम्यान गेल्या तीन दिवसात धरणातून ४०.३२ दलघमी (१.४२ टिएमसी) पाणी धरणातून सोडण्यात आले आहे.
जायकवाडी धरणातून १८ दरवाजातून सुरू असलेला १५ हजार क्युसेक्स चा विसर्ग शुक्रवारी रात्री ८ वा ५००० क्युसेक्स ने घटवून १०,००० क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला.दरम्यान आवक पुन्हा घटल्याने शनिवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान १८ दरवाज्या पैकी १० दरवाजे पूर्ण बंद करून आणखी ५००० हजार क्युसेक्स क्षमतेने विसर्ग घटविण्यात आला. ३ वाजेच्या सुमारास धरणात येणारी आवक नगण्य होत धरणाची पाणीपातळी घटण्यास प्रारंभ झाला. जायकवाडी प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी या बाबत कार्यकारी अभियंता सी आर बनसोडे यांच्याशी चर्चा करून जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग बंद करण्याचे आदेश यंत्रणेस दिले. दु. ३ ते ३.३० दरम्यान सर्व दरवाजे बंद करण्यात आले.
९८.०७% जलसाठा कायम ठेवणार.आज जायकवाडी धरणाचा जलसाठा ९८.०७% झाला आहे. १ ऑक्टोबर २०१७ पर्यंत ९८.०७% जलसाठा ठेवण्यात येणार असून त्या नंतर १००% जलसाठा धरणात राखता येणार आहे. असे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
स्थानिक पाणलोट क्षेत्रावर करडी नजर.नाशिक विभागातून येणाऱ्या पाण्याचे अंतर जास्त असल्याने या पाण्याचे अनुमान काढता येतात व त्या दृष्टीने पाणी सोडण्याचे व पूर नियंत्रित करण्याचे नियोजन करता येते परंतू जायकवाडी धरणाच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात ३०% पाणलोट क्षेत्र येते. या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस काही तासातच जायकवाडी धरणात जमा होतो. यात प्रामुख्याने खाम, नारंगी, ढोर, नाणी व शिवणा नदीद्वारे गतीने
पाणी धरणात दाखल होते. या ३०% पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली व जायकवाडी धरण पूर्ण जलसंचय पातळीजवळ असले तर तातडीने धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. गुरुवारी सुध्दा या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात काही तासात आवक जमा होण्यास प्रारंभ झाला व तातडीने धरणातून पाणी सोडावे लागले होते. या धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात तात्पुरती सरिता मापण केंद्रे उभारण्यात आली असून या भागातून येणाऱ्या पाण्यावर २४ तास करडी नजर ठेवण्यात येणार आहे. या मुळे या क्षेत्रात अतिवृष्टी झाली तरी नियोजन करूनच नियंत्रित विसर्ग करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता सी आर बनसोडे यांनी सांगितले.
पाऊस उघडलाजायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस उघडला असून आता जायकवाडी धरणात आवक येण्याची शक्यता धुसर बनली आहे. यामुळे विसर्ग बंद करून धरणाच्या डाव्या कालव्यातून ९०० तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे.