पैठण : जायकवाडी धरण काठोकाठ भरत आले असताना पाण्याची आवक वाढल्यामुळे रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणाचे चार दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून गोदापात्रात विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर रविवारी रात्री ११ ते २ वाजेच्या सुमारास धरणाचे आणखी १२ दरवाजे उघडून १०४८० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान, आवक कमी झाल्याने सोमवारी टप्प्याटप्प्याने ८ दरवाजे बंद करण्यात आले. सोमवारी रात्री धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात ४१९६ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.
जायकवाडी धरणाचा जलसाठा सोमवारी सायंकाळी ९९.७८ टक्के झाला होता. धरणात ७७८१ क्युसेकने पाणी येत होते, तर धरणातून विविध मार्गाने ७७८१ एवढाच विसर्ग करण्यात येत होता. आवक व विसर्ग एकच ठेवण्यात येत असल्याने धरणात ९९.७८% जलसाठा कायम राहील, असे धोरण सध्यातरी जायकवाडी प्रशासनाने निश्चित केले असल्याचे समोर आले आहे.
जायकवाडी धरणाचे चार दरवाजे रविवारी सायंकाळी ६ वाजता अर्ध्या फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात २०९७ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला. यानंतर रात्री ११ वाजता पुन्हा आठ दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग ६२८८ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. परत रात्री १२ वाजता आणखी दोन दरवाजातून विसर्ग करण्यात आला. यानंतरही रविवारी रात्री धरणात येणारी आवक वाढत राहिल्याने पुन्हा रात्री २ वाजता आणखी दोन दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला. रविवारी रात्री २ वाजेपर्यंत जायकवाडी धरणाच्या १६ दरवाजातून ८३८४ क्युसेक असा विसर्ग सुरू होता.
सोमवारी पहाटे धरणात येणारी आवक पुन्हा वाढल्याने पहाटे ५ वाजता १० व २७ क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटावरून एक फूट वर उचलून विसर्ग ९४३२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. परत सकाळी ६ वाजता १६ व २१ या दरवाजातून विसर्ग वाढवून तो १०४८० करण्यात आला.सोमवारी सकाळी ९ वाजेनंतर धरणात येणारी आवक घटल्याने १० वाजता जे चार दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले होते, ते पुन्हा अर्धा फूट करून विसर्ग घटविण्यात आला. दुपारी १२ वाजता चार दरवाजे, एक वाजता पुन्हा २ दरवाजे व सायंकाळी ५ वाजता दोन असे एकूण आठ दरवाजे बंद करण्यात आले.जायकवाडी धरणात १०० टक्के जलसाठा राखण्याचे आमचे नियोजन असून, त्या दृष्टीने येणारी आवक व धरणातून होणारा विसर्ग यावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. दरम्यान, धरण १००% भरले असल्याने कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधणे यांचे पथक जायकवाडी धरणावर करडी नजर ठेवून आहेत.
पात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सोमवारी रात्री धरणाच्या आठ दरवाजातून ४१९२ क्युसेक क्षमतेने तर जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक असा मिळून गोदावरीपात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सुरू होता. याचप्रमाणे उजवा कालवा ७०० व डावा कालवा १३०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.४१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी आज दुपारनंतर १५२१.९६ फूट कायम राहिली, तर जलसाठा ९९.७८% कायम होता. धरणात २९०४.९६ दलघमी जलसाठा झाला असून, यापैकी २१६६.१५९ दलघमी जिवंत जलसाठा आहे. धरणात ७७८१ क्युसेक क्षमतेने आवक व धरणातून सर्व मार्गाने तेवढाच विसर्ग सुरू होता.