पैठण: स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस व नाशिक, नगर जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेल्या पाण्यामुळे गेल्या चार दिवसात धरणाच्या जलसाठ्यात ४.११ % वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी धरणात १६ हजार ३५० क्युसेक आवक सुरू होती. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत आवक घटून ९ हजार ७९८ क्युसेक झाली होती. सध्या धरणाचा जलसाठा ४३.५७% झाला आहे.
आज दुपारी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणासाठी होणारे विसर्ग घटविण्यात आले होते. दि २२ सप्टेंबर पासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग सुरू असून अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पाच दिवसा पासून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू आहे. परिस्थिती पाहूण हे विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी सायंकाळी दारणा धरणातून ११००, गंगापूर धरणातून ००, पालखेड धरणातून ८७४ क्युसेक्स व नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून ३६६२ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठान येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी १०००० क्युसेक्स क्षमतेने वहात होती. यामुळे जायकवाडी धरणात पुढील दोन ते चार दिवस सातत्याने आवक सुरू राहील अशी अपेक्षा आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाणी.... भंडारदरा धरणातून ००० क्युसेक्स, निळवंडे धरणातून ८२६ असा विसर्ग करण्यात येत होता. शुकी ओझर वेअर मधून प्रवरेत १८९५ क्युसेक्स विसर्ग सुरू होता, हे पाणी गतीने जायकवाडी कडे झेपावले असून सायंकाळी नेवासा तालुक्यातील मधमेश्वर बंधाऱ्यातून ३८०५ क्युसेक्स क्षमतेने जायकवाडीसाठी पाणी मिळत होते.
जलसाठा ४३.५७ % दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून आवक होत असल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी जलसाठा ४३.५७ % झाला होता. गतवर्षी आजच्या तारखेला मात्र धरणात ९९.९५% जलसाठा होता. शुक्रवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०९.८७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १६८३.८८५ दलघमी झाला असून या पैकी ९४५.७७९ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.