- विकास राऊत
औरंगाबाद : नाथसागराची (जायकवाडी धरण) ४४ वर्षांत पहिल्यांदाच दुरुस्ती होणार असून, जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाच्या यादीत धरणाचा समावेश झाला असून, ४० कोटी रुपयांचा निधी ड्रीप-२ (डॅम रिहॅबिलेशन अॅण्ड इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट-२) या योजनेतून धरणासाठी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. या योजनेचा पहिला टप्पा झाला त्यावेळी धरणाचा समावेश झाला नव्हता. १४७ पैकी राज्यातील ३० प्रकल्पांची ड्रीप-२ मध्ये निवड झाली आहे. त्यामध्ये जायकवाडी धरणाचा समावेश करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही, दरवाजे दुरुस्ती, सुरक्षा टॉवर, संरक्षक कुंपण, सिव्हिल दुरुस्ती, वीजपुरवठा, आयबी दुरुस्तीच्या कामांसाठी ४० कोटींचा निधी केंद्र शासन जागतिक बँक प्रकल्पातून देणार आहे. सोबत संत ज्ञानेश्वर उद्यान सुशोभीकरणासाठीदेखील ३२ कोटींचा निधी मिळण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
१९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची धरणात क्षमता आहे. धरणाला ४४ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे करण्याची गरज आहे. या काळात सर्वाधिक वेळा दरवाजांचे आॅपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग गेल्या वर्षी करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला.
दरवाजांची दुरुस्ती महत्त्वाची४४ वर्षांत धरणांवरील दरवाजांची तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली आहे; परंतु आता आॅईलिंग, ग्रीसिंगसह मेकॅनिकल कामे करावी लागणार आहेत. ४ कोटी रुपयांचा निधी दरवाजांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात येणार आहे. गेल्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे ४६ दिवस खुले करण्यात आले. धरणाला एकूण २७ दरवाजे असून, १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे उघडलेले नव्हते. १० ते २७ क्रमांकांपर्यंतचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणाच्या ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड पहिल्यांदाच झाला आहे. आजवर ५ ते १० वेळा ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड आहे. १०० पेक्षा अधिक वेळा ‘गेट आॅपरेशन’ मागच्या पावसाळ्यात झाले. यावर्षी चांगला पाऊस असल्याचे हवामान खात्याचे भाकीत आहे, त्यामुळे दरवाजांची किरकोळ दुरुस्ती सध्या सुरू, असल्याचे अभियंता काळे यांनी सांगितले.
अर्ध्या मीटरने उंची वाढविणारधरणाची पाण्याच्या ‘टॉप लेव्हल’वरून अर्धा मीटर उंची वाढविण्याचे ड्रीप योजनेत म्हटले आहे. साधारणत: ५० सेंटीमीटर, ३० सेंटीमीटर आणि २० सेंटीमीटर या मापात १० कि.मी.पर्यंत धरणाचा ‘टॉप लेव्हल’ स्तर वाढविण्यात येणार आहे. सोबतच स्थापत्य अभियांत्रिकीची काही कामे आहेत. धरण सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक कामांचा यामध्ये समावेश आहे. डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात असून, निधीबाबत निर्णय होताच काम सुरू होणे शक्य होणार असल्याचे काळे यांनी सांगितले.