पैठण ( औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने धरणात १६३२५ क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली असून बुधवारी सकाळी धरण ४८% भरले होते. गुरूवारी सकाळपर्यंत धरण ५०% पेक्षा जास्त भरेल अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी व्यक्त केली आहे.
जायकवाडी धरणाची भिस्त नाशिक जिल्ह्यातील बंदिस्त पाणलोटक्षेत्रावर अवलंबून असल्याचे गेल्या काही वर्षात समोर आले आहे. मराठवाड्यातील धरणे भरली असताना दुसरीकडे यंदा नाशिक जिल्हात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून तेथून आवक न झाल्याने जायकवाडी धरण अद्याप ५०% रिकामे आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरण ९९% भरले होते. १ जून रोजी धरणात ३५% जलसाठा शिल्लक होता. यंदा यात १५ % वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाचे मुख्य पाणलोटक्षेत्र असलेल्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून यंदा पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. नाशिक जिल्ह्यातील धरणे सरासरी ७०% भरली असून तेथील धरणे भरल्यानंतर नांदूर मधमे्श्वर वेअर मधून जायकवाडी साठी पाणी सोडले जाते. सध्या या बंधाऱ्यातून फक्त ७२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील पाण्याची प्रतिक्षा जायकवाडी प्रशासनास आहे.
हेही वाचा - जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५१०.९४ इतकी होती. धरणात एकूण पाणीसाठा १७७८.३०६ दलघमी (६२ टिएमसी) तर उपयुक्त जलसाठा १०४०.२०० दलघमी (३६ टीएमसी) इतका झाला होता. गत वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा २१४१.०८३ दलघमी (९९%) एवढा होता. जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने धरणात १६३२५ एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू आहे. यामुळे येत्या २४ तासात धरणाचा जलसाठा ५०% पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा धरण अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केली आहे.