औरंगाबाद : जायकवाडी धरण क्षेत्रात आणखी महिनाभर पाऊस न झाल्यास शहरातील पाणी परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. सिडको-हडकोप्रमाणे शहरातही आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ मनपावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जायकवाडी धरणाच्या मध्यभागी महापालिकेने आपतकालीन पंप हाऊस उभारला आहे. या पंप हाऊसजवळ ४५० मीटरची एक विहीर करण्यात आली आहे. सध्या या विहिरीत मनपाचे दोन फ्लोटिंग पंप २४ तास पाण्याचा उपसा करीत आहेत. पंप हाऊसपासून डाव्या कालव्यापर्यंत अॅप्रोच चॅनलद्वारे पाणी आणण्याचे काम सुरू आहे. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया असली तरी दिवसेंदिवस मनपाचे संकट वाढू लागले आहे. दरवर्षी जायकवाडी धरणात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हमखास पाणी येते. यंदा धरण क्षेत्रही कोरडे पडले आहे. त्यामुळे पुढील एक ते दीड महिना जायकवाडीत नवीन पाणी येण्याची शक्यताही कमीच आहे. धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली आहे. महिनाभरानंतर आपतकालीन पंपापर्यंत पाणी आणण्यासाठी नवीन खोदकाम करावे लागणार आहे. सध्या शहराला १०० ते ९८ एमएलडी पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. शहरात सर्वत्र चार दिवसाआड तर सिडको-हडकोत आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणी देण्यात येत आहे.
शहर अभियंत्यांनी घेतली बैठकशहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी गुरुवारी रात्री पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेसंदर्भात बैठक घेतली. सिडको-हडकोतील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या भागात विविध उपाययोजना करण्याचे निश्चित झाले आहे. याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.