बीड : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी कोणताही निधी आणि मान्यता न घेता कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली खोटी निविदा काढून मराठवाड्यातील जनतेची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी रविवारी सायंकाळी आष्टी येथे पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, भाजप आमदार सुरेश धस यांनी तब्बल ७० गावांना फायदा होणाऱ्या विकास कामांमध्ये खोडा घातला आहे. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना स्थगिती देण्याचे पत्र आ.धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या कामासाठी १५०० कोटी रुपये उपसा जलसिंचन योजनामधून मंजूर झाले होते. मात्र, सुरेश धस यांनी पत्र दिल्याने कामाला स्थगिती देण्यात आली आहे, असा आरोप आजबे यांनी केला होता.
आ. आजबे यांच्या आरोपानंतर आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, निधीची तरतूद नसताना वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना अशा प्रकारची निविदा काढताच येत नाही. तरी ती निविदा काढण्यात आलीय. त्यामुळे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी खोटीनाटी याला मान्यता दिली आहे.
जलसंपदा मंत्री म्हणून पाटील यांनी खोटेनाटे काम केले. खोटी निविदा काढली. प्रेशराईज केले. त्यांनी मराठवाड्याची फसवणूक करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात करणार आहे आणि वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार आहे. असा एक प्रकारचा इशाराही आमदार धस यांनी दिला आहे.