औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना मनपा आयुक्तांनी स्वच्छ महाअभियान आणि मलेरिया विभागप्रमुख म्हणून केलेल्या अतिरिक्त पदस्थापनेस खंडपीठात आव्हान दिले आहे. न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. के.एल. वडणे यांनी नगरविकास आणि आरोग्य विभागाच्या सचिवांसह महापालिकेला नोटीस बजावण्याचा आदेश दिला. याचिकेची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. डॉ. कुलकर्णी या पूर्वी महापालिकेत आरोग्य अधिकारी होत्या. ते पद रिक्त झाल्यामुळे महापालिकेच्या निवड समितीने डॉ. कुलकर्णी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याची शिफारस केली. मात्र मनपाच्या सर्वसाधारण सभेने तो ठराव नामंजूर केला. म्हणून डॉ. कुलकर्णी यांनी शासनाकडे धाव घेतली. नगरविकास विभागाने मनपाचा ठराव विखंडित केला. १३ मे २०१५ रोजी मनपा आयुक्तांना आदेश देऊन डॉ. कुलकर्णी यांना वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती देऊन शासनाकडे अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानुसार मनपा आयुक्तांंनी २४ जून २०१५ रोजी डॉ. कुलकर्णी यांना वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती दिली. दरम्यान, डॉ. कुलकर्णी रजेवर असताना मनपाच्या जुन्या ठरावाचा संदर्भ देत डॉ. सुहास जगताप यांना ३० सप्टेंबर २०१५ रोजी प्रतिनियुक्तीवर वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर महापालिकेत रुजू करून घेण्यात आले. त्यामुळे ‘एक पद आणि दोन अधिकारी’ अशी परिस्थिती निर्माण झाली. डॉ. कुलकर्णी यांनी त्यावेळी खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने शासनाला याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शासनाने आजपर्यंत निर्णय घेतला नाही. मनपात एका पदावर दोन अधिकारी कार्यरत असल्यामुळे अडचण निर्माण झाली असून डॉ. जगताप यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी, असे आयुक्तांनी शासनाला कळविले असल्याचे डॉ. कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. मनपा आयुक्तांनी २० आॅगस्ट २०१६ रोजी एका प्रशासकीय आदेशाद्वारे डॉ. कुलकर्णी यांना स्वच्छ महाअभियान आणि मलेरिया विभागप्रमुख म्हणून नियुक्ती दिली. त्यावर डॉ. कुलकर्णी यांनी आक्षेप घेऊन म्हटले आहे की, त्यांची नियुक्ती कायद्यानुसार वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर झाली आहे. प्रशासकीय आदेशाद्वारे त्या पदावरून त्यांना हटविता येणार नाही.आयुक्तांचा २० आॅगस्टचा आदेश अतिरिक्त कार्यभार म्हणून स्वीकारत आहोत. आपण वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी म्हणून कार्यरत आहोत. डॉ. जगताप यांनी हस्तक्षेप करू नये, असा आदेश देण्याची विनंती डॉ. कुलकर्णी यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांनी अॅड. बी.एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. आयुक्तांचे आॅगस्ट २०१६ मधील अतिरिक्त पदस्थापनेचे आदेश रद्द करावेत. तसेच आपणास वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी म्हणून काम करूदेण्याचे आदेशित करावे, अशी विनंती डॉ. कुलकर्णी यांनी केली आहे. मनपातर्फे अॅड. दिलीप बनकर पाटील काम पाहत आहेत.
जयश्री कुलकर्णी पुन्हा खंडपीठात
By admin | Published: September 21, 2016 12:07 AM