औरंगाबाद : ‘सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय’ अशा जयघोषातच शुक्रवारचा सूर्योदय झाला. भक्ती आणि शक्ती यांचा अद्भुत संगम असलेल्या श्री हनुमानाचा जन्मोत्सव सूर्योदयालाच असल्याने रामभक्तांनी मध्यरात्रीपासूनच जन्मोत्सवाची तयारी करून ठेवली होती. सूर्योदयापासून ते रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये हनुमानभक्तांची गर्दी दिसून आली. अपार उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. शहराचे ग्रामदैवत असलेल्या सुपारी हनुमान मंदिरात पहाटेपासून लघुरुद्र अभिषेकाला सुरुवात झाली होती. विजय पुजारी व नरेंद्र पुजारी यांनी विधिवत पूजा केली. यावेळी सुपारी हनुमानाच्या मूर्तीला विविध फुलांनी सजविण्यात आले होते. मूर्तीला चांदीचा मुकुट घातल्याने तिचे सौंदर्य आणखी खुलले होते. सर्व जण सूर्योदयाची वाट पाहत होते. आरतीची थाळी घेऊन भाविक उभे होते. सकाळी ६ वाजून २० मिनिटे झाली आणि घंटानादामध्ये आरतीला सुरुवात झाली ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी... जयदेव जयदेव जय जय हनुमंता’ अशी एकासुरात सर्वांनी आरती म्हटली. यानंतर ‘सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय’ असा जयघोष करण्यात आला. शहरात ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांत असेच दृश्य अनुभवायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत सुपारी हनुमान मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. पानदरिबा येथील जागृत हनुमान मंदिरात मागील वर्षीच ५१ किलो चांदीचा मखर तयार करण्यात आला आहे. आज सकाळी व्यास परिवाराच्या वतीने येथे जागृत हनुमानाची आरती करण्यात आली. कैलासनगर येथील स्मशानमारुती मंदिरातही पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. येथे सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी व्यापारी हरिशंकर दायमा यांच्या हस्ते आरती झाली. सकाळी ८ वाजेपासून येथे महाप्रसादाला सुरुवात झाली होती. नवाबपुरा येथील गंगाधन हनुमान मंदिरात नारायणसिंह, जयसिंह, अमरसिंह, दरबारसिंह व शक्तीसिंह होलिये परिवाराच्या वतीने मारुतीरायाची आरती करण्यात आली. येथील हनुमान बैठक असलेल्या ६ फूट उंच मूर्तीला आकर्षक हार घालण्यात आला होता. येथेही आसपासच्या परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. औरंगपुरा येथील जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही सकाळी आरतीसाठी गर्दी झाली होती. जुन्या रॉक्सी टॉकीजसमोरील कानफाट्टे हनुमान मंदिरातही आज मोठी गर्दी झाली होती. येथेही मंडप उभारण्यात आला होता. तसेच कासारी बाजारातील लंगोटिया मारुती, जाधव मंडीतील जबरे हनुमान मंदिरातही शेकडो भाविकांच्या साक्षीने हनुमान जन्माची आरती करण्यात आली. कर्णपुरा येथील पंचमुखी हनुमान मंदिरातही दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. औरंगाबाद लेणीसमोरील भागात असलेल्या हनुमान टेकडीवरही आज हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सिडको एन-६ येथील आविष्कार कॉलनीत हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती करण्यात आली. ह.भ.प. पोपट महाराज यांचे कीर्तन झाले. रात्री ८.३० वाजता संगीतमय सुंदरकांड पारायणात सर्व भाविक रमले होते. सिडको एन १ मध्ये जयंती उत्साहात येथील सिडको एन १, भक्तीनगरातील जागृत हनुमान मंदिरात हनुमान जयंती विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरी करण्यात आली . नगरसेवक राजू शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सकाळी दिनेश कुलकर्णी यांचे कीर्तन तर जयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी कल्याण देशपांडे यांचे गीत रामायण झाले. दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीरही घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा जोशी, स्मीता वालसेकर, चंद्रकांत वालसेकर, प्रदीप डागा, मदन देशपांडे, विनायक वालसेकर, चैतन्य जोशी, प्रसाद भंडारी, उमेश कुलकर्णी, रोहित वालसेकर, ऋषीकेश भालेराव आदिनी परिश्रम घेतले. काल्याच्या कीर्तनाने सांगताप्रकाशनगर येथील श्री महारुद्र हनुमान मंदिराच्या वतीने श्रीराम नवमीच्या दिवशी सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची श्री हनुमान जयंतीला सांगता झाली. श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हभप विनायक महाराज आष्टीकर यांच्या अमृतवाणीने काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनासाठी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती. शोभायात्रा उत्साहातऔरंगाबाद : ‘अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान’ अशा भक्तिपर गीतावर हनुमान भक्त थिरकले. प्रसंग होता, हनुमान जयंतीनिमित्त पानदरिबा येथील जागृत हनुमान मंदिरापासून सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेचा. जागृत हनुमान मंदिरात दरवर्षी सकाळी शोभायात्रा निघत असे. यंदा मात्र प्रथमच शोभायात्रा सायंकाळी काढण्यात आली. या शोभायात्रेत युवा हनुमानभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सजविलेल्या रथात रामभक्त हनुमानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. सहभागी झालेल्या सर्व हनुमानभक्तांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. अग्रभागी उंट व घोड्यांवर चिमुकले स्वार झाले होते. त्यांच्या हातात भगवा ध्वज होता. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामागे बैलगाडीत शहनाई चौघाडा हे मंगलवाद्य वाजविण्यात येत होते. टाळ, मृदंगाच्या तालावर बाल वारकरी पावली खेळत होते. मध्येच फुगडी खेळत रिंगण केले जात होते. पाठीमागे भजनी मंडळातील महिला भजन गात शोभायात्रेतील उत्साह वाढवत होत्या. ढोल-ताशांचा निनादाने परिसर दणाणून गेला होता. याच शोभायात्रेत चाळीसगावचे बँड पथक आणण्यात आले होते. या बँड पथकाने श्रीराम, हनुमान यांची महती सांगणारी विविध भक्तिगीते वाजवून सर्वांना थिरकण्यास भाग पाडले. गाणे संपल्यावर ‘सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय,’ असा जयघोष केला जात होता. शोभायात्रा पानदरिबा येथून निघाली. ती गुलजार टॉकीजमार्गे केळीबाजार, मछलीखडक, सुपारी हनुमान रोड, गुलमंडी, दिवाणदेवडीमार्गे पुन्हा पानदरिबा येथील जागृत हनुमान मंदिर येथे आली. यानंतर आरती करण्यात आली. या शोभायात्रेचे नेतृत्व सतीश व्यास यांनी केले. यावेळी राजेश व्यास, मिथुन व्यास, दीपक व्यास, संजय व्यास, प्रीतेश व्यास, गौरव व्यास, पृथ्वीराज पवार, अंबादास दानवे, लक्ष्मीनारायण बाखरिया, ऋषिकेश जैस्वाल, मिलिंद दाभाडे, मनोज पाडळकर, वृषभ कासलीवाल, सचिन थोरात यांच्यासह हनुमानभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.