वाळूज महानगर : नांदेडकडून शिर्डीकडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या जीपचा स्टिअरिंग रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून जीप ट्रकवर धडकली. ही घटना गुरुवारी पहाटे लिंक रोड चौकात घडली. या अपघातात जीपमधील ११ युवक बालंबाल बचावले. यात काही जण किरकोळ जखमी झाले.३१ डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बारड (ता.मुदखेड) या गावातील १० युवकांनी शिर्डीला देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखला. या युवकांनी टाटा सुमो जीप भाड्याने घेऊन ते शिर्डीकडे निघाले. १ जानेवारीला पहाटे २.३० वाजेच्या सुमारास पैठण लिंक रोडवर ए. एस. क्लब चौकातील गतिरोधकावर जीप आदळली. सुसाट जीप गतिरोधकावर आदळताच स्टिअरिंग रॉड तुटल्यामुळे चालक भागवत पांचाळ यांचे जीपवरील नियंत्रण सुटले व ही जीप समोर जाणाऱ्या ट्रकवर जाऊन जोरात धडकली. जीपमध्ये साखरझोपेत असलेले श्रीकांत बहिवाल, संतोष लोमटे, शांतीलाल जैस्वाल, विठ्ठल पांचाळ, संजय पांचाळ, सुनील वाघमारे, सोहन पातरकर, गणेश बसवंती, शेख जैस्वाल, रुपेश जैस्वाल, चालक भागवत पांचाळ (सर्व रा. बारड हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जखमी युवकांना धीर देऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. श्रीकांत बहिवाल या युवकास मुका मार लागला असून, प्राथमिक उपचारानंतर सर्व युवकांना सुटी देण्यात आली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
ट्रकवर भरधाव जीप धडकली
By admin | Published: January 02, 2015 12:39 AM