आडगाव येथील रहिवासी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणेश शिंदे यांनी सांगितले की, तालुक्यातील जेहूर, आडगाव, मुंगसापूर, तांदुळवाडी या परिसरात तर नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील घाटमाथा परिसरात जातेगाव, बोलठाण, लोढरे, रोहिला, गोंडेगाव, जवळकी या परिसरात दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले. हा आवाज इतका मोठा होता की, उंचावरून एखादी मोठी वस्तू जमिनीवर पडली की काय, असे वाटले. सुमारे वीस किलोमीटर परिसरातील जमिनीला हादरा बसला.
काही ठिकाणी तर दुपारची वेळ असल्याने व बाहेर उन्हाचा तडाखा असल्याने, घरात झोपलेले नागरिक अचानक आवाजामुळे दचकून बाहेर आले, तर या आवाजाने काही ठिकाणी घरातील वर ठेवलेली भांडीही खाली पडल्याचे काही नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी परिसरात एकमेकांना फोन करून चौकशी करून नेमका आवाज कशाचा आला काही दुर्घटना झाली का, याबाबत चौकशी केली, परंतु नेमका आवाज कशाचा आला, याचे उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक विविध तर्कवितर्क लावताना दिसले.
कोट
भूकंपाची रिश्टर स्केलवर नोंद हैद्राबाद येथील केंद्रात होते. त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. तथापि, अद्यापपर्यंत तरी त्यांच्याकडून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
- संजय वारकड, तहसीलदार