औरंगाबाद : ऐन उड्डाणाच्या वेळी मंगळवारी सकाळी जेट एअरवेजचे औरंगाबाद - मुंबई विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नादुरुतीमुळे विमान रद्द झाल्याने प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागले. या सगळ्या प्रकाराविषयी प्रवाशांनी संताप व्यक्त केला
या विमानात खा. रावसाहेब दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विकास जैन आदींसह ९३ प्रवासी होते.औरंगाबाद -मुंबई विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
औरंगाबादहुन मुंबईला जाणारे हे सकाळी ६.५० वाजता उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. अभियंत्यांनी तात्काळ पाहणी केली. तेव्हा विमान उड्डाण करू शकणार नाही, हे जाहीर करण्यात आले. अन्य विमानाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. परंतु दुपारी धावपट्टी बंद असते, त्यामुळे दुसरे विमान येणे अशक्य आहे, असे जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काही प्रवाशांना येथील हॉटेलमध्ये थांबवण्यात आले, तर स्थानिक काही प्रवाशांनी संध्याकाळच्या विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराने विमानतळावर एक ते दीड तास गोंधळ निर्माण झाला.