औरंगाबाद : जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानाचे ३१ मार्चपासून पुन्हा उड्डाण सुरू होणार होते; परंतु या विमानाचे उड्डाण लांबणीवर पडले असून, आता ६ एप्रिलपासून हे विमान सुरू होईल, अशी माहिती जेट एअरवेज आणि चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई या दोन्ही विमानांचे उड्डाण सध्या बंद आहे. जेट एअरवेजने प्रारंभी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी येणारे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानही रद्द के ले. हे विमान पुन्हा कधी उड्डाण घेणार, याविषयी अनिश्चितता व्यक्त होत होती; परंतु अखेर सकाळच्या विमानाचे ३१ मार्चपासून उड्डाणाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.
चिकलठाणा विमानतळावरून फक्त ट्रू जेट आणि एअर इंडियाच्या विमानांचे उड्डाण सुरू आहे. जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्याने औरंगाबादहून मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. त्यामुळे मुंबईचा हवाई प्रवास महागल्याचा अनुभवही प्रवाशांना येत आहे. जेट एअरवेजचे सकाळचे विमान आता ३१ मार्चऐवजी ६ एप्रिलपासून उड्डाण घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही दिवस या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
५ एप्रिलपर्यंत रद्द जेट एअरवेजचे सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ५ एप्रिलपर्यंत रद्द राहणार आहे, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली, तर आॅपरेशनल कारणांमुळे सकाळच्या विमानाचे ३१ मार्चऐवजी आता ६ एप्रिलपासून उड्डाण सुरू होईल.बुकिंग केलेल्या प्रवाशांना रिफंड देण्यात येत आहे. सायंकाळच्या विमानाच्या उड्डाणाविषयी काही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली.