आळंद : कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने औरंगाबादेतील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याची तक्रार मयत महिलेच्या मुलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रुग्णालय प्रशासनाची सविस्तर चौकशी करून, दागिने परत मिळवून देण्यासाठी ते एप्रिल महिन्यापासून चकरा मारीत आहेत. मात्र, अद्यापही त्यांची कोणी दखल घेतली नाही. रुग्णालय प्रशासनाने मात्र, हे आरोप फेटाळले आहेत.
दिलेल्या निवेदनात नमूद केले की, फुलंब्री तालुक्यातील नायगव्हान येथील मालनबाई भिवसन भालेराव यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने, नातेवाइकांनी ७ एप्रिल, २०२१ रोजी औरंगाबादेतील गजानन हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर येथे दाखल केले होते. कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू झाले. त्यावेळी मालनबाई यांच्या अंगावर मंगळसूत्र, सोन्याच्या बाळ्या व इतर असे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे दागिने होते. कोरोनामुळे नातेवाइकांना आत जाण्यासाठी परवानगी नव्हती. दरम्यान, १२ एप्रिल रोजी सायंकाळी मालनबाई यांचा मृत्यू झाला. नातेवाईक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, त्यांना मयतास बघू न देता, मृतदेह तसाच मनपा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला. त्यांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दोन दिवसांनी मालनबाईच्या अंगावरील दागिन्यांबाबत कुटुंबीयांच्या लक्षात आले. मुलगा भाऊसाहेब व दीपक भालेराव यांनी गजानन हॉस्पिटलमध्ये जाऊन दागिन्यांबाबत चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तसेच हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती करूनही टाळाटाळ करण्यात आली. यानंतर, त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले. मात्र, पोलिसांनी केवळ आश्वासन देऊन बोळवण केली. कारवाई होत नसल्याने भालेराव यांच्या मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन देऊन दागिने मिळवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, याकडे अद्यापही कोणी लक्ष दिले नाही.
कोट
कोरोनामुळे आईचा मृत्यू झाला, त्यावेळी अंगावर ८० हजार रुपयांचे दागिने अंगावर होते. ते दागिने गायब असून, रुग्णालय प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी अनेक वेळा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. याबाबत पुंडलिकनगर पोलिसांना, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणीही दखल घेतली नाही.
- भाऊसाहेब भिवसन भालेराव, मयत महिलेचा मुलगा.
कोट
मी उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करतो. त्यामुळे रुग्णांच्या अंगावरील दागिन्यांबाबत मला काहीही माहिती नाही.
डॉ.गीतेश दळवी
-गजानन हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर, औरंगाबाद.
290621\img-20210629-wa0132.jpg
फोटो ओळ:मालनबाई भालेराव यांचे दागिने मिळण्यासाठी भाऊसाहेब भालेराव यांनी पोलिस ठाणे व जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन.