सुरेश चव्हाणकन्नड : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशपर अभंगाचा सार ओळखून शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार यांनी अधिकमासाचे औचित्य साधून गरीब आणि भिकाºयांना धोंड्याचे जेवण दिले. विशेष म्हणजे फक्त जेवणच नाही तर या अतिथींचा मानसन्मानदेखील केला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे शहरात प्रथमच आयोजन करण्यात आले होते.शहरातील शीतलामाता गल्लीतील पवारवाड्यात श्री दत्त मंदिर आहे. शनिवारी पहाटेपासूनच वाड्यात लगबग होती. धोंडा खाण्यासाठी अतिथी येणार होते. त्यामुळे पहाटेच स्वयंपाकाला सुरुवात झाली होती. आमरसाबरोबर पुरणपोळी, आमटी, भजे, कुरडई, भात असा बेत होता. साडेअकरा वाजेच्या सुमारास महिलांची पंगत बसली. या पंगतीत सर्व समाजातील गरीब आणि भिकारी महिला बसल्या होत्या. स्टीलच्या ताटात सर्व पदार्थ वाढले गेले आणि सनईच्या सुरात सर्व अतिथींनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर हिंदू महिलेला साडी किंवा नऊवारी, पीस, तांब्याचे पात्र आणि दोनशे रुपये व सोबत लहान बाळ असेल तर शंभर रुपये, मुस्लिम महिलांना ड्रेस मटेरियल, दोनशे रुपये, तांब्याचे पात्र व सोबत लहान बाळ असल्यास शंभर रुपये देऊन हे अतिथी नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वर आहेत असे समजून पवार कुटुंबियांनी त्यांचे दर्शनही घेतले. याच पद्धतीने पुरुष मंडळींचाही अशाच पद्धतीने सन्मान करण्यात आला. शहरातील सुमारे ३०० महिला-पुरुषांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात गरिबांना दान (खैरात) देण्याला धार्मिक महत्त्व आहे तर यावर्षी सध्या सुरू असलेल्या अधिकमासाला हिंदू धर्मात धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. अशा या महत्त्वपूर्ण महिन्यात अगदी मनोभावे आणि जातीभेदाच्या भिंतींना थारा न देता हा कार्यक्रम करून वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला.---------------
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:49 AM