औरंगाबाद : एण्ड्रेस हाउजर ग्रुपने भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सीएसआर फंडातून प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. केवळ जेएनईसीच नव्हे, तर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे एण्ड्रेस प्लस हाउजर इंडिया प्रायव्हेट लिमिट्सचे व्यवस्थापकीय संचालक कैलास देसाई यांनी सांगितले.
जेएनईसी महाविद्यालयात डॉ. जॉर्ज एच हाउजर प्रक्रिया इन्स्ट्रूमेंटेशन प्रशिक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवारी पार पडले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंपनीचे एशिया आणि पॅसिफिकचे कॉर्पोरेट सेल्स संचालक जेन्स विंकलमॅन यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी श्रीराम नारायणन, कुलथु कुमार, नरेंद्र कुलकर्णी, रूपेश कोल्ले, हेमल देसाई, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, विश्वस्त प्रताप बोराडे, रजिस्ट्रार डॉ. आशिष गाडेकर उपस्थित होते. साहित्य आणि नियंत्रणावरच नव्हे तर उद्योगातील पुढच्या पिढीच्या नेतृत्वावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यापैकी जेएनईसी एक माध्यम आहे. विद्यार्थ्यांना कंपनीत जे काम शिकावे लागते ते काम विद्यार्थ्यांना आताच शिकता येईल. त्यासाठी ३८ लाख रुपयांपर्यंतची अत्याधुनिक यंत्र सामग्री प्रयोगशाळेसाठी देण्यात आल्याचे देसाई म्हणाले.