औरंगाबाद : दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचे पडसाद शहरात उमटत असून याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा शहर कार्यालयाबाहेर निदर्शने करून हल्ल्याचा निषेध सोमवारी दुपारी करण्यात आला.
रविवारी रात्री जेएनयू विद्यापीठात काही हल्लेखोरांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला केला. यातील हल्लेखोर हे अभाविप, बजरंग दल आणि भाजप संबंधित इतर संघटना असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.यावेळी केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यानंतर क्रांती चौक येथे सुद्धा आंदोलकांनी निदर्शने केली.
आंदोलनात राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्युम शेख, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष अक्षय पाटील, शहराध्यक्ष मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष अमोल दांडगे, फिरोज पठाण, युवती शहराध्यक्ष अंकिता विधाते, अश्विनी बांगर, दीक्षा पवार आदींची उपस्थिती होती.