औरंगाबाद : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेल्या हल्लाप्रकरणाचे तीव्र पडसाद मराठवाड्यात उमटले असून औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड व नांदेड येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये विविध संस्था, संघटना व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
औरंगाबादेत विद्यार्थी संघटनांचे शहरभर आंदोलनऔरंगाबाद : जेएनयू हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी सोमवारी शहरभर आंदोलन केले. एमआयएम, एसएफआय, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी या संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निषेध नोंदवला. एनएसयूआय संघटनेने विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलन केले. तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शहरातील भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. देवगिरी महाविद्यालयाच्या समोर एबीव्हीपीच्या पदाधिकाऱ्यांनीही हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मानवी साखळी निर्माण केली. यावेळी विद्यार्थ्यांनी एबीव्हीपी, गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएसच्या विरोधात घोषणाबाजी केली.
जालन्यात गांधी चमन येथे निदर्शनेजालना : दिल्ली येथील जेएनयू हल्लाप्रकरणी निषेध करीत विविध संस्था, संघटना, विद्यार्थी, युवक, नागरिक संघर्ष समितीतर्फे सोमवारी गांधी चमन येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करुन न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी निदर्शकांनी केली.
परभणीत राष्ट्रवादीचा काँग्रेसचा तीव्र निषेधपरभणी : दिल्ली येथील जेएनयू हल्ला प्रकरणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध नोंदविला आहे़ या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन पाठविले असून त्यात अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे़
हिंगोलीत विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींना निवेदनहिंगोली : जेएनयू येथील हल्ल्याच्या निषेध करीत हिंगोली येथील विद्यार्थी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले. यात हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नांदेडात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीनांदेड : जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली़ यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या़ दरम्यान, नसोसवायएफच्या वतीने दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनजेएनयू येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बीड आणि अंबाजोगाईत विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. अंबाजोगाई येथील विद्यार्थी संघटनांच्या वतीने दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. एसएफआय, डीवायएफआयच्या वतीने मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बीड येथेही एआयएसएफच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात एआयएसएफ, एआयवायएफ, एसएफआय, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनाला अंनिसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्टÑपतींना निवेदन देण्यात आले.