छत्रपती संभाजीनगर : घरकाम, वेटर, ड्रायव्हरलासुद्धा विदेशात नोकरी मिळू शकते. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार केला. या करारानुसार जर्मनीत ३० प्रकारच्या नोकऱ्या करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण संबंधित उमेदवारांना घ्यावे लागणार आहे. हे प्रशिक्षण विविध शहरांमध्ये मोफत देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही प्रशिक्षणासाठी काही शैक्षणिक संस्थांसोबत चर्चा सुरू असून, सुरुवातीला शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांना प्रशिक्षण देणार आहेत.
यावर करा नोंदणीशालेय शिक्षण विभागाने राज्यातील १० हजार युवकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला पुरेशा प्रमाणात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर, पुणे सोबत करार केला आहे. त्यासाठी इच्छुक शिक्षकांना परिषदेच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर नोंदणी करायची आहे.
यांना मिळणार विदेशात नोकरीची संधी
जर्मनीमध्ये परिचारिका, प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषासेवक, फिजिओथेरपिस्ट, लेखा व प्रशिक्षण, वेटर्स, स्वागत कक्ष संचालक, आचारी, हॉटेल व्यवस्थापक, लेखपाल, हाऊसकीपर, इलेक्ट्रिशियन, रंगारी, सुतार, गवंडी, प्लंबर्स, वाहनांची दुरुस्ती करणारे, चालक, सुरक्षा रक्षक, टपाल सेवा वितरक, विक्री सहायक अशा एकूण ३० प्रकारांतील शिक्षण घेतलेल्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना नोकरीची संधी मिळणार आहे.
प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात केंद्रेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणारी विविध केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यात सुरुवातीला एमजीएम संस्थेतील केंद्राचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पहिल्या टप्प्यात १० हजार जणांना संधीजर्मन भाषा शिकविण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षणवर्ग या प्रकरणात १० हजार विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रशिक्षणवर्गाची आवश्यकता आहे. सदर प्रशिक्षणवर्ग दोन सत्रांत असल्यामुळे २०० प्रशिक्षणवर्ग प्रस्तावित आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० हजार युवकांना संधी मिळणार आहे.
इच्छुकांनी सहभागी व्हावेजर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शिक्षण विभाग जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणार आहे. त्यात इच्छुकांनी सहभागी व्हावे.- सान्वी देशमुख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था