लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून खेटरांचा हार घातला. शहरातील शिवाजी चौकात शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे शेतकऱ्यांसंदर्भात ‘तूर खरेदी केली, तरीही रडतात...’ असे उद्गार काढले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यापूर्वीही दानवे यांनी ‘सरकारने कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, याची लेखी हमी द्यावी’ असे विरोधी पक्षांना म्हटले होते. दानवे हे शेतकरीविरोधी आहेत. मराठवाड्यात दुष्काळ नव्हता मात्र आम्ही मुद्दाम खूप दुष्काळ आहे, माणसं स्थलांतर करीत आहेत, असे ओरडून सांगितले म्हणून मदत मिळाली, असे धक्कादायक वक्तव्यही दानवे यांनी केले होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके, जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, अंगद पवार, प्रदीप चौकटे, अमित खंडेलवाल, सुनीता चाळक, प्रकाश होदतपुरे, नंदकुमार पवार, रमेश पाटील, प्रल्हाद पाटील, विशाल माने, सूरज झुंजे, कुलदीप सूर्यवंशी, दिनेश जावळे, अमर बुरबुरे, बाबुराव शेळके, महेश साळुंके, सोमनाथ आग्रे आदी उपस्थित होते.
दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन
By admin | Published: May 11, 2017 11:39 PM