वाळूज महानगर: चोरीची दुचाकी विक्रीसाठी ग्राहकाचा शोध घेणाऱ्या अट्टल दुचाकी चोरट्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी जोगेश्वरीत जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून विविध ठिकाणांवरुन चोरी केलेल्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अनिल बन्सोडे (२७ रा.जोगेश्वरी) असे चोरट्याचे नाव असून, त्याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यांत तब्बल १९ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
जोगेश्वरी परिसरात शुक्रवारी एक इसम चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती डीबी पथकाचे प्रमुख राहुल रोडे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल रोडे,पोहेकॉ. वसंत शेळके, रामदास गाडेकर, वसंत जिवडे, पोना. शैलेंद्र अडियाल, सुधीर सोनवणे, प्रकाश गायकवाड, पोकॉ. मनमोहन कोलिगी, बंडु गोरे, राजकुमार सुर्यवंशी, दीपक मतलबे, बाळू लहरे आदींच्या पथकाने जोगेश्वरी सापळा रचला. या दुचाकी चोरट्यास पकडण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहकाला पाठविला.
यावेळी डमी ग्राहकास त्या चोरट्याने ५ हजार रुपयांत दुचाकी विक्री करण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथक अनिल शामराव बन्सोडे याला शिताफीने पकडले. अनिल बन्सोडे याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने औद्योगिक परिसर व शहरातून आणखी चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. जोगेश्वरीत तलावालगत च्या शेतातून चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत.