वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे.
सरपंच सोनुताई लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, उपसरपंच मंगलबाई निळ, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, अमोल लोहकरे आदींची उपस्थिती होती. ग्रामसभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा कृती आराखडा तयार करुन अंदाजपत्रकास मंजुरी घेणे, प्रधानमंत्री घरकुल योजना, स्वच्छतागृह उभारणे, ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करणे आदी विषयी ठेवण्यात आले.
सभेत नागरिकांनी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कमळापूर-रामराई व नायगाव-बकवालनगर या ठिकाणी नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याची मागणी केली होती. या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जोगेश्वरी, कमळापूर, रामराई, नायगाव, बकवालनगर या पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. आजघडीला या पाचही गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जोगेश्वरीपासून नायगाव-बकवालनगर, रामराई, कमळापूर आदी गावांचे अंतर जवळपास ४ किलोमीटर आहे.
त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यास शासनाकडून लोकसंख्येच्या तुलनेत कमी निधी मिळेल तसेच नायगाव-बकवालनगर व कमळापूर हद्दीत मोजकेच कारखाने येत असल्यामुळे कर वसुलीत या गावाचा सर्वांगीण विकास होणार नसल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी हात उंचावून बहुमताने ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी भालेराव यांनी दिली.
या ग्रामसभेत साडे सात कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देऊन विविध विकास कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामसभेला सदस्य सुर्यभान काजळे, माजी सरपंच प्रविण दुबिले, योगेश दळवी, अनिता सरोदे, सुनिल वाघमारे, छाया बोंबले, सुमनबाई काजळे, कलीम शहा, लक्ष्मीबाई कर्डिले, वनिता नरवडे, कल्याण साबळे, पंडीत पनाड, लक्ष्मीबाई चव्हाण, करुणाबाई सोनकांबळे, प्रकाश वाघचौरे, काकासाहेब वाघमारे, माणिकलाल बिलवाल, मिना पनाड, सुभाष कर्डक, अरुण पठारे, नितीन पवार, नानेकर, सुदाम काजळे, सतीश देवकर,अशपाक बेग आदींची उपस्थिती होती.