वाळूज महानगर : थकीत कराचा भरणा करण्यास कारखानदार टाळाटाळ करीत असल्यामुळे जोगेश्वरी ग्रामपंचायतीने थकीत कराच्या वसुलीसाठी कारखान्याची यंत्र सामुग्री जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचायतीचा कारखान्याकडे जवळपास दोन कोटीचा कर थकीत असल्यामुळे ग्रामपंचायततर्फे जप्तीची मोहीम हाती राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात वाळूज उद्योगनगरीतील १५५ कारखान्यांचा समावेश आहे. शासनाच्यावतीने दोन-तीन वर्षांपूर्वी मालमत्तेच्या मुल्यांकनानुसार कर वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या नवीन कर प्रणालीला स्थानिक उद्योजकांनी विरोध दर्शविला असून, कलम १२५ नुसार कर वसुलीत सूट द्यावी, यासाठी उद्योजकांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे.
या वसुलीबाबत उद्योजकांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या. जोगेश्वरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या १५५ कारखान्यापैकी जवळपास ५० टक्के कारखान्याकडे ग्रामपंचायतीचा अंदाजे २ कोटी रुपयाचा कर थकला आहे. थकीत कराच्या वसुलीसाठी पोलिस बंदोबस्त मिळताच जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सरपंच सोनुताई लोहकरे, उपसरपंच मंगलताई निळ, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव यांनी लोकमतशी बोलतांना दिली.