जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ याशिवाय आणखीही प्राचीन लेणी आहेत. केवळ योग्य माहिती नसल्याने पर्यटक या लेण्यांचा आस्वाद घेऊ शकत नाहीत. यातीलच एक लेणी आहे जोगेश्वरी. जंगल, नदी, धबधबा आणि लेणी असा एकत्रित नजराणाच येथे तुमची वाट पाहत आहे. वेरूळ लेण्यांच्या माथ्यावर असलेली ही लेणी अत्यंत लक्षवेधी आहे. येथे एकूण चार लेण्या आहेत. लेण्याच्यावर उगमस्थान असलेली खाचखळग्यातून वाहणारी येळगंगा नदी येथील वातावरण अधिकच मनमोहक बनविते. असा हा आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडी वाट करून एकदा तरी पाहायलाच हवा.
कसे जाल -
औरंगाबादपासून खुलताबाद २५ किमी आहे. खुलताबादपासून म्हैसमाळच्या रस्त्यावर गेल्यास काही अंतरावर डावीकडे जोगेश्वरी माता मंदिर अशी पाटी दिसेल. येथून एक ते दोन किमी आत गेल्यास एक वस्ती लागते. इथे रस्ता थांबतो आणि सुरू होते पाऊलवाट. गाड्या येथेच पार्क करून चालत पुढे गेल्यास काही अंतरावर दोन पाऊलवाटा दिसतात. घनदाट झाडी आणि बारीक झुडपांच्या जंगलातून जाणाऱ्या दोन्ही वाटा लेण्याकडेच जातात. येथून दहा मिनिटे चालत गेल्यास येळगंगा नदीचे मात्र नजरेस पडते. त्यापुढेच लेण्या आहेत. मुख्यतः पाऊलवाट आणि लेणी परिसरात खाचखळगे असल्याने जास्त पावसात येथे जाणे टाळा.
काय पाहाल -
वेरूळमधून वाहणाऱ्या येळगंगा नदीचा येथे उगम होतो. धबधब्याच्या रूपाने खाली येणारी ही नदी वाहत जोगेश्वरी लेण्याकडे येते. एका कोपऱ्यात दीपमाळ दिसते, तर समोर विहिरीसारखी कुंड आहेत. एका लेण्यात जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. दुसऱ्या लेण्यात कोरलेले अस्पष्ट कैलास शिल्प आहे, तर आणखी दोन लेण्यांत गर्भगृह आहेत. तिकडे जाण्याचा रस्ता खराब आहे. मात्र, दुरूनच लेण्यावरील सुरेख कोरीव काम लक्ष वेधून घेते. ग्रामस्थांच्याशिवाय खूप कमी जणांना माहिती असलेली ही लेणी पर्यटक आणि लेणी अभ्यासकांना पर्वणीच आहे.