-----------------------
दारूच्या नशेत कामगारांना मारहाण
वाळूज महानगर: दारूच्या नशेत कंपनीत घुसून कामगारांना मारहाण करणाऱ्या तिघाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पप्पुसिंग राजपूत व लक्ष्मण राजपूत हे घाणेगाव शिवारातील सुयोग इंडस्ट्रीजमध्ये काम करतात. मंगळवारी (दि.२९) दुपारी २ वाजेच्या सुमारास हे दोघे कंपनीत काम करत असतांना समीक्षा मॅटचे मालक दिनेश कापकर (रा. नंदनवन कॉलनी) त्यांचा मॅनेजर शिंदे, विजयसिंग अनुसिंग हे तिघे मद्यप्राशन करुन सुयोग इंडस्ट्रीजमध्ये गेले होते. या तिघांनी कंपनीत काम करणाऱ्या पप्पुसिंग व लक्ष्मण यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. या प्रकरणी कंपनी मालक संजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------------
साजापूरात शिक्षिका मंगला मराठे यांना निरोप
वाळूज महानगर : साजापूर जि.प.शाळेच्या शिक्षिका मंगला मराठे या सेवानिवृत्त झाल्याने बुधवारी (दि.३१) त्यांना शाळेच्यावतीने निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक धनंजय नागमवाड, संजय काळे, शिला पारखे, अकीला शेख, जाकेरा पठाण, सलीम पठाण, संतोष कदम, नसरीन बानो, अलकनंदा आंधळे आदींची उपस्थिती होती.
----------------------------
लॉकडाऊन रद्द झाल्याने उद्योगनगरीत समाधान
वाळूज महानगर : लॉकडाऊन रद्द झाल्यामुळे वाळूज उद्योगनगरीतील अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री उशिरा लॉकडाऊन रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे हातावर पोट असणारे तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
----------------------
वाळूजमहानगरात उन्हाचा पारा वाढला
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने नागरिक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर रुमाल व टोपी घालुन वावरत आहे. या परिसरात दोन दिवसापासून तापमानात चांगलीच वाढ झाली. कडक उन्हामुळे रस्त्यावरील तसेच बाजारपेठेतील गर्दीही बऱ्यापैकी ओसरली आहे.
------------------------