बाजारसावंगी : परिसरात ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती देण्यासाठी विमा कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधला; मात्र तो होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नुकसानीचा विमा टाळण्यासाठी कंपन्या जाणूनबुजून संपर्काबाहेर असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्याचीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
अतिवृष्टीमुळे बाजारसावंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत टोलफ्री क्रमांकावर कळविण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची माहिती देण्यासाठी दोन दिवसांपासून शेतकरी विमा कंपन्यांचा टोल फ्री क्रमांक डायल करीत आहेत. तसेच इतर मार्गांनीही संपर्क साधायचा प्रयत्न करीत आहेत; मात्र तो होत नसल्याने नुकसान भरपाई मिळेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच नुकसानाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर पायपीट करीत तालुका कार्यालयावर जाण्याची वेळ आलेली आहे; मात्र तेथे गेल्यानंतरही भरपाई मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी याचा नाद सोडून दिला आहे. यामुळे विमा कंपन्यांचे चांगलेच फावत आहे.
तीन दिवस सुट्या
अतिवृष्टीनंतर शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या असल्याने या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झालेली आहे. एकीकडे झालेले नुकसान तर दुसरीकडे विमा मिळेल, याची खात्री नाही. तर तिसरीकडे तक्रार व पंचनामेही होईना, यामुळे विमा काढूनही उपयोग होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
चौकट
विमा कंपन्या पळवाटा काढत आहेत
आम्ही वेळेत विमा कंपनीकडे विमा हफ्ता भरुन पिकासाठी संरक्षण मिळविले; मात्र विमा कंपन्यांनी पळवाटा व विविध अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. यामुळे बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विमा कंपन्या नफ्यात राहण्यासाठी हा खटाटोप करीत असल्याचा आरोप बाजारसावंगी येथील विमाधारक शेतकरी जानकीराम नलावडे व सुधाकर औटे यांनी केला आहे.