औरंगाबाद : यशस्वी पत्रकार ते आमदार आणि आता थेट खासदारापर्यंतचा प्रवास इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पूर्ण केला. जलील यांनी आपल्या कारकीर्दीत ज्या क्षेत्रात उडी मारली तेथे हमखास यश प्राप्त केले आहे. ‘लोकमत’वृत्तपत्र समूहात तब्बल ११ वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीत तब्बल १२ वर्षे ते पुण्यात ब्युरो चीफ होते. २०१४ मध्ये त्यांनी अचानक राजकारणात उडी मारली अन् अवघ्या २३ दिवसांमध्ये आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. लोकसभेची उमेदवारी प्राप्त झाल्यानंतर मिळालेल्या केवळ २८ दिवसांच्या कालावधीत खेळलेल्या योग्य व अचूक राजकीय डावपेचाला अथक परिश्रमांची जोड देत खासदारपदही मिळविले. त्यांचा हा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.औरंगाबादच्या मातीत जन्मलेल्या इम्तियाज जलील यांचे शालेय शिक्षण होलीक्रॉस इंग्रजी शाळेत झाले. वडील सिव्हिल सर्जन असल्याने उच्चशिक्षित कुटुंबात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. दिसायला सुंदर, राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाने महाविद्यालयीन शिक्षण मौलाना आझाद महाविद्यालयातून पूर्ण केले. महाविद्यालयात असताना इम्तियाज जलील उत्कृष्ट वक्तेही होते. महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेत त्यांच्यावर ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची नजर पडली. या उत्कृष्ट वक्त्याला त्यांनी ‘लोकमत टाइम्स’मध्ये आणले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागातून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. तब्बल ११ वर्षे त्यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहात यशस्वी पत्रकारिता केली. २००० च्या दशकात देशभरात वृत्तवाहिन्यांचे जाळे वाढू लागले. इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातून थेट एनडीटीव्हीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात या वाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना त्यांची भेट हैदराबाद येथील मजलिस- ए- इत्तेहाद- उल- मुस्लिमीन पक्षाचे खा. असदोद्दीन ओवेसी यांच्याशी झाली. ओवेसी यांच्या व्यक्तिमत्त्वाने इम्तियाज जलील यांना चांगलेच प्रभावित केले होते.२०१४ मध्ये महाराष्टÑ विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. एनडीटीव्हीचा राजीनामा देऊन जलील थेट औरंगाबादला आले. निकटवर्तीय पत्रकारांना आपल्या भडकलगेट येथील निवासस्थानी सल्लामसलत करण्यासाठी बोलावले. एमआयएमकडून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी बोलून दाखविला. क्षणभर सर्व पत्रकार मित्रांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती नव्हती. त्यामुळे मुस्लिम मतांवर बाजी मारता येणे शक्य आहे, असा ठाम विश्वास त्यांना होता.२३ दिवसांमध्ये आमदार२०१४ विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला. अवघ्या २३ दिवसांमध्ये शहरातील वातावरण ढवळून निघाले. मुस्लिम समाजाने ही निवडणूक आपली समजून तन, मन, धनाने काम केले. सेना-भाजप उमेदवारांमधील मतविभाजनाचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला व आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली.२८ दिवसांमध्ये खासदारया वेळेस लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला. लोकसभा निवडणूक न लढविता एमआयएमने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाताखालील बहुजन वंचित आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अचानक आ. जलील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांची उमेदवारी देण्याची अजिबात इच्छा नव्हती. एमआयएम नगरसेवक, कार्यकर्त्यांनी हट्ट धरला. या हट्टापुढे ओवेसी यांनीही नमते घेत परवानगी दिली. त्यानंतर अवघ्या २८ दिवसांमध्ये जलील यांनी जिल्हा ढवळून काढला. आंबेडकर अनुयायी व मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा ही निवडणूक आपली असल्याचे समजून काम केले. आज मतमोजणीनंतर निकाल सर्वांसमोर आहे.
पत्रकार ते खासदारापर्यंतचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:46 AM
औरंगाबाद : यशस्वी पत्रकार ते आमदार आणि आता थेट खासदारापर्यंतचा प्रवास इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पूर्ण केला. जलील यांनी ...
ठळक मुद्देइम्तियाज जलील : महाराष्टच्या राजकारणात घडविला इतिहास