औरंगाबाद : शहरात दररोज एक हजारपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ८० ते ९० टक्के रुग्णांना महापालिकेचे कोविड केअर सेंटर हवे असते. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोविड केअर सेंटर हाउसफुल झाले आहेत. शहरात ९ हजारपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत. नवीन रुग्णांसाठी विभागीय क्रीडा संकुल आणि देवगिरी बॉइज् होस्टेल येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे.
महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एक ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. रविवारी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ३४ टक्के होता. रिकव्हरी रेट ८० टक्के आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक कसा लावावा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. आतापर्यंत प्रशासनाने रात्रीचा कर्फ्यू लावला. दर आठवड्याला शनिवार-रविवार २४ तास संचारबंदी लावली. याशिवाय अनेक व्यापक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यानंतरही सुपर स्प्रेडर रुग्ण महापालिकेला सापडायला तयार नाहीत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना बेड मिळणे कठीण जात आहे. विद्यापीठाच्या रमाई येथील कोविड सेंटरमध्ये घाटी रुग्णालयातील बरे होत असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. यशवंत, छत्रपती शाहू महाराज कोविड सेंटरमध्ये अनुक्रमे १८० आणि २०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता महापालिकेने नवीन कोविड केअरसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. विभागीय क्रीडा संकुल येथे ३०० तर देवगिरी बॉईज सेंटर येथे २२५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
६० मंगल कार्यालयांची तपासणीशहरातील ६० मंगल कार्यालयांची आतापर्यंत महापालिकेने तपासणी केली आहे. ज्या ठिकाणी सोयी-सुविधा जास्त आहेत, तेथे मंगल कार्यालयाचे रूपांतर सीसीसीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.