औरंगाबाद : कार खरेदीसाठी माहेरहून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाला वैतागून एका विवाहितेने आपल्या दोनवर्षीय चिमुकलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे रुळाजवळ उघडकीस आली.वैशाली महेश सिल्लोडकर (२५, रा. ११ वी योजना, शिवाजीनगर) व इशिका (२) असे या माय-लेकीचे नाव आहे. वैशालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा महेश सिल्लोडकर, सासरा संतोष सिल्लोडकर व सासू, अशा तीन आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मूळ जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील वैशालीचा विवाह २०१३ मध्ये शिवाजीनगरातील महेश सिल्लोडकरसोबत झाला होता. लग्नानंतर वर्षभर सासरच्या मंडळींनी तिला गुण्यागोविंदाने नांदविले. त्यानंतर मात्र किरकोळ कारणावरून सासरच्या मंडळींनी वाद उकरून काढत वैशालीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला सासरची ही मंडळी चक्क उपाशीपोटी ठेवू लागली. शिवीगाळ, मारहाण करू लागली. गेल्या काही महिन्यांपासून तर त्यांनी पैशांसाठी वैशालीच्या मागे तगादा लावला. आरोपी महेशला कार खरेदी करायची होती. इकडे वैशाली मुलीसह घरातून गायब झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी फोन करून ती तिकडे आली का, अशी विचारणा केली. संशय आल्याने माहेरच्या मंडळींनी औरंगाबाद गाठले. सोमवारी सकाळी रेल्वे रुळावर या माय-लेकीचे प्रेत सापडले. वैशालीचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू आहे, याची माहेरच्यांना कल्पना होती. त्यांच्या जाचाला वैतागूनच तिने आत्महत्या केली, हे लक्षात आल्यानंतर वैशालीचे वडील रघुनाथ प्रजापती यांनी पुंडलिकनगर ठाण्यात फिर्याद दिली. फौजदार सचिन मिरधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवरा महेश, सासरा संतोष व सासूला अटक केली.
मातेची लेकीसह रेल्वेसमोर उडी
By admin | Published: August 17, 2016 12:26 AM