औरंगाबाद : चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीत अडथळा निर्माण झाला आहे. पण लवकरच मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे १२ ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे मराठवाड्यात आगमन होईल, असा अंदाज एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सध्या पावसाची आतुरतेने प्रतीक्षा सुरू आहे. त्यात हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरीही मान्सूनच्या आगमनाच्या तारखेबद्दल अजून अनिश्चितता आहे. अंदमान आणि बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग व्यापल्यानंतर केरळकडे निघालेल्या नैऋत्य मान्सूनचा प्रवास थोडा रखडला आहे. यामुळे मान्सूनचे केरळातील आगमन २८ मे ऐवजी ३ जूनच्या आसपास होण्याचीच शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महासेन नावाच्या चक्रीवादळाने मान्सूनच्या वाऱ्यामध्ये आर्द्रता निर्माण केल्याने या वाऱ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण झाला आहे. यामुळे मान्सूनची प्रगती खुंटली आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मान्सूनच्या मराठवाड्यातील आगमनाविषयी अंदाज व्यक्त केला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल अजून थांबलेली आहे. परंतु लवकरच हे वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर तो मराठवाड्यात पोहोचण्यास साधारणत: आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल.
१५ जूनपर्यंत मान्सून येणार
By admin | Published: May 23, 2016 1:18 AM