लोहारा : लोहारा ग्रामपंचायत ही तालुकास्तरीय ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याबाबत शासनाने मागील काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासकीय स्तरावरून प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात आक्षेप नोंदविण्यासाठी ३० जूनपर्यंत ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्यातील ज्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत, अशा ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मागील काही महिन्यांपूर्वीच घेतला होता. या निर्णयानंतद लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि यासंदर्भातील प्रक्रियेला स्थगिती मिळाली. दरम्यान, आता निवडणूक झाल्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ३१ मे रोजी उद्घोषणा काढली. लोहारा ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र ग्रामीणमधून नागरीमध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी लोहारा नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत. या संदर्भातील आक्षेप नोंदविण्यासाठी ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे आक्षेप जिल्हाधिकारी किंवा लोहारा तहसील कार्यालयात नोंदविता येणार आहेत. ग्रा.पं. कार्यालय लोहारा येथे उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नगर पंचायत झाल्यानंतर लोहारा ग्रामपंचायतीतील संपूर्ण क्षेत्र, गावठाण व सर्व्हे नं. १ ते २१८ पर्यंत क्षेत्राचा समावेश होईल.
आक्षेप नोंदविण्यास ३० जूनची डेडलाईन
By admin | Published: June 02, 2014 12:08 AM