औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील गोळेगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत गोळेगाव कृषी महाविद्यालयात परीक्षा देत असताना ‘तू सिनियरची इज्जत का करीत नाही’, म्हणून इमारतीच्या छतावरून ढकलून दिल्याचा जबाब अविनाश रेंगे या जखमी विद्यार्थ्याने दिल्यानंतर या प्रकरणात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ येथील गोळेगाव येथे असलेल्या कृषी महाविद्यालयात इमारतीच्या छतावर प्रॅक्टिकलची परीक्षा सुरू असल्याने अविनाश रेंगे हा छतावर गेला असता तेथे संतोष जवळगे याने तू सीनियर म्हणून माझी इज्जत का करीत नाहीस, असे म्हणून अगोदर चापट बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने इमारतीवरून ढकलून दिले. यामध्ये अविनाश यांच्या हातपाय दोन्ही मोडल्याने नांदेड येथे उपचारार्थ पाठविण्यात आले होते.
औंढा पोलिसांनी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमी अविनाश रेंगे यांचा जबाब नांदेड येथे घेतला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना परीक्षा सुरू असताना घडल्याने तेथे जबाबदार प्राध्यापक उपस्थित होते की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामध्ये आणखी दोषी व्यक्तींवर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.