पिशोर : कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. केवळ दैव बलवत्तर म्हणून एक अडीच वर्षीय चिमुरडी बचावली, तर बारावर्षीय मुलीसह महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटील वसंतराव शिंदे यांनी पिशोर पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. यावरून फौजदार सत्यनारायण वैष्णव, शेख गुलफाम, वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रातच डॉ. मेघा शेवगण यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात दुपारी दोघी मायलेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत रंजनाबाई हिच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके, पो. कॉ. शेख नदीम, के. एस. गवळी आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून फौजदार वैष्णव या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर) निरागस चेहर्याने चैताली मृतदेहांकडे पाहत बसली चैतालीला तर काय झाले कळतच नव्हते. निरागस चेहर्याने ती आई व बहिणीच्या मृतदेहांकडे पाहत असल्याने ग्रामस्थांना अश्रू आवरता आले नाही. गावकर्यांच्या मदतीने रंजना, सोनाली व चैताली यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात रंजना व सोनाली या दोघी मायलेकींना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. नाचनवेल येथील रंजना विलास गोराडे (३५) हिने रागाच्या भरात सोनाली (वय १२) व चैताली (वय अडीच वर्षे) यांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून अडीच वर्षीय चैताली पाण्याच्या मोटारीचा पाईप व मोटारीला ताण दिलेल्या वायरलूपच्या मध्ये अडकली. लहानगी चैताली रात्रभर तशीच विहिरीत अडकून होती.
दोन मुलींसह आईची विहिरीत उडी
By admin | Published: May 16, 2014 12:27 AM