राजेश खराडे , बीड जलयुक्त अभियानातील कामे मिळवून निधी मुरविण्यासाठी आता ठेकेदार कृषी अधिकाऱ्यांना थेट धमक्यांची भाषा करू लागल्याचे गुरूवारी समोर आले. यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याच जिल्ह्यात अभियानाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिल २०१६ पासून होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील कामांकरिता जिल्ह्यातील २४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावांची नावे जाहीर होताच स्थानिक पातळीवरील गुत्तेदारांमध्ये हालचाल सुरू झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या कामांचाही समावेश करून बिले अदा करण्याविषयीच्या धमक्या थेट अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. सद्य:स्थितीला केवळ गावांची नावे जाहीर झाली असून, आवश्यकतेनुसार कामांची यादी जाहीर केली जाणार आहे. याकरिता दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. निविदा पद्धतीमुळे अडचणीत आलेल्या ठेकेदारांनी धमकीसत्र सुरू केले आहे. जलयुक्त अभियानाचीही अवस्था रोहयोप्रमाणेच होते की काय, अशी स्थिती आहे. तालुकानिहाय गावे बीड - ३२, शिरूर - २७, आष्टी -२३, पाटोदा - २२, केज - २९, अंबाजोगाई - २५, परळी - २०, गेवराई - २७, माजलगाव - १४, वडवणी - १२, धारूर - ११.
‘जलयुक्त’मध्ये ठेकेदारांची दांडगाई !
By admin | Published: February 19, 2016 12:15 AM