छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय, तहसीलदार व अन्य अनुषंगिक कार्यालयांमध्ये विविध अर्ज, निवेदने, तक्रारी दप्तर दिरंगाईमुळे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ३० जुलैपर्यंत सगळ्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश मंगळवारी एका प्रशिक्षणादरम्यान दिले.
शून्य प्रलंबितता अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय प्रशिक्षणाने या अभियानाची सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले, ३० जुलै ही अंतिम तारीख ठरवून त्या तारखेपर्यंतची सर्व पत्र, निवेदने, तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
महिन्याभरात असे करावे लागेल काम३ ते ७ जुलै उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय स्तरावर प्रशिक्षण, ७ ते १७ जुलै प्रत्यक्ष कामकाज, स्वच्छता, छाननी, वर्गवारी, प्रलंबितता शोधमोहीम राबविणे, तक्रार निवारण दिवस २० ते २२ जुलै दरम्यान घेणे, २३ ते २८ जुलै प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन निकाली काढणे, २८ ते २९ जुलै सर्व प्रपत्रात माहिती पाठविणे, ३० जुलै शून्य प्रलंबितता घोषित करणे.
जरा धूळ झटका गठ्ठ्यांवरीलदप्तराच्या अद्ययावतीकरणासह सहा गठ्ठा पद्धतीने अभिलेखे लावण्याचे आदेश स्वामी यांनी दिले. दप्तराच्या नोंद वह्या, अभिलेख कक्ष अद्ययावत करावे लागेल. संपूर्ण कार्यालयाची साफसफाई, नस्ती, कागदपत्रे तपासून त्यांचे वर्गीकरण, गठ्ठे, सूची बनवणे, कार्यालय व्यवस्थापन, कार्यालये पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न, अभ्यागतांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही कामे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.