औरंगाबाद : अवैध पिस्तूलसह काडतुसे बाळगून शहरात फिरणाऱ्या पाच जणांना मागील तीन दिवसात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यात तीन पिस्तूलसह ७ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. या कारवाईमुळे दिवाळीपुर्वीच अवैध पिस्तूल आणि काडतुसांचा धमाका उडाल्याचे समोर आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज, क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी कुख्यात गुंड इम्रान मोहमंद लतीफ यास गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध पिस्तूल व पाच काडतुसांसह अटक केली होती. यास दोन दिवस होताच उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरणारा कुख्यात गुंड सोनु उर्फ पांढऱ्या रामकुमार घुसर (३७, रा. चुनाभट्टी, गांधीनगर), अजय दामोधर नरवडे (४० रा. वार्ड नं. १९, पुष्पनगरी) या दोघांना पकडले. या दोघांकडे पिस्तूल आढळुन आले. हे देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आहे. हे पिस्तूल विकण्यासाठी ते घेऊन फिरत होते. या दोन्ही आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातुन ५० हजार रुपयांचे पिस्टूल व दुचाकी (एमएच २० ईआर ४९१५) असा १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदवला. दुसरी कारवाई उपनिरीक्षक अमोल मस्के यांच्या पथकाने तिसगांव परिसरात केली. मटका चालविणारा बालाजी रोहीदास ताईनात (४२, रा. एकरुखा, जि. परभणी, ह.मु. वडगाव कोल्हाटी) व टपरीचालक गणेश कारभारी साेनवणे (रा. चिखला, जि. बुलढाणा, ह.मु. म्हाडा कॉलनी, तिसगाव शिवार) या दोघांना पकडले. त्यातील बालाजी ताईनात याच्याकडे पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे आढळुन आली. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कल्याण शेळके, अमाेल मस्के, सहायक उपनिरीक्षक शेख हबीब, रमेश गायकवाड, विजय निकम, राजेेंद्र साळुंके, संजय गावंडे, संजय मुळे, नितीन देशमुख, संदीप सानप, सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, विठ्ठल सुरे, तातेराव सिनगारे यांनी केली.
एकाची सुपारी तर दुसऱ्याची विक्रीबसस्थानक परिसरात पिस्तूलसह पकडलेला साेनु उर्फ पांढऱ्या हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याने पिस्तूल विक्री करण्यासाठी आणले होते. तर तिसगाव शिवारात मटका चालविणारा बालाजी ताईनात याने स्वत:च्या सुरक्षेसाठी पिस्तूल पानटपरी वाल्याकडून घेतले होते. ताईनात याला मारण्याची सुपारी दिल्याची माहिती मिळाल्यामुळे त्याने पिस्तूल विकत घेतल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
गुन्हेगारांकडे पिस्तूलसिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी अटक केलेला इम्रान लतीफ हा एमपीडीए अंतर्गत कारागृहात राहुन आलेला आहे. त्याला पकडल्यानंतर त्याने पोलिसांवर आरोप केले. यानंतर सोनु उर्फ पांढऱ्या हा सुद्धा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधातही १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हेगार राजरोसपणे पिस्तूलसह जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याचेही समोर आले आहे.