वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी मातब्बर आजी-माजी पदाधिकाऱ्यांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर दोन्ही गटांकडून सदस्यांची पळवा-पळवी सुरु आहे.
या ग्रामपंचायतीचे सरपंच पपीनकुमार माने यांच्यावर ७ सदस्यांनी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यानंतर सदस्य अनिल साळवे हे १० सदस्यांना सोबत घेऊन अज्ञात स्थळी रवाना झाले आहे. दरम्यान, सरपंचपद कायम राहावे, यासाठी पपीनकुमार माने यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. सहलीसाठी न गेलेल्या ६ सदस्यांना सरपंच माने यांनी आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
चार वर्षांपूर्वी या ग्रामपंचायतीचे निवडणूक होऊन सरपंचपदी सुभाष तुपे यांची निवड झाली होती. मात्र, गतवर्षी सरपंच तुपे यांचे निधन झाल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते. या पदावर पपीन माने यांची निवड झाली होती. सरपंच पदासाठी अडुन बसलेले अनिल साळवे यांना कार्यकाळ संपण्यापूर्वी ६ महिने अगोदर सरपंच करण्याचे आश्वासन आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दिले होते. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीतपणे सुरु असताना ७ सदस्यांनी सरपंच मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर गावातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. अविश्वास प्रस्ताव बारगळावा यासाठी विद्यमान सरपंच माने यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माजी सभापती मनोज जैस्वाल व माजी सरपंच सईदाबी पठाण यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. ग्रामपंचायत सदस्यांना आपल्या बाजुने वळविण्यासाठी या दोन्ही आजी-माजी पदाधिकारी पडद्याआडून सुत्रे हलवित असून, यात कोणाची सरशी होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.